- Home
- Mumbai
- Mumbai Rain : या जिल्ह्यात उद्या २६ जुलैला रेड अलर्ट, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Mumbai Rain : या जिल्ह्यात उद्या २६ जुलैला रेड अलर्ट, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
पालघर - पालघर जिल्ह्यात उद्या शनिवार, २६ जुलै रोजी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी ही माहिती दिली आहे.

आज आहे ऑरेंज अलर्ट
आज शुक्रवारी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट होता आणि काही भागांमध्ये सतत पावसाची संततधार सुरू आहे. उद्या अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. आजही अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
सूर्या नदीला पूराचा इशारा
शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणांमधून १०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होणार आहे. त्यामुळे नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. धामणी धरणाचे तीन दरवाजे ५० से.मी. ने उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे काही भागांमध्ये पाणी साचू शकते.
कोणाला सुट्टी आणि कोणाला काम?
सर्व माध्यमांच्या शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये बंद असतील. मात्र, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज करतील, असे आदेशात नमूद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुटी असेल पण शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्यांना सुटी राहणार नाही. त्यांनी नियमितपणे शाळेत हजर राहायचे आहे.
स्थानिक पातळीवरही निर्णयाचा अधिकार
भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात किंवा काही विशिष्ट भागांमध्ये प्रशासन निर्णय घेऊ शकते. संभाव्य धोका टाकण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आवाहन केले?
सावधगिरी बाळगा, अनावश्यक प्रवास टाळा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. अधिकृत माहितीकरता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना पाहत राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.

