ही घटना सकाळी ९:२७ वाजता घडली. विमान उतरत असताना मुंबईतील जोरदार पावसामुळे धावपट्टी ओलसर व निसरडी झाल्याने हे "रनवे एक्सकर्शन" घडलं.
मुंबई - कोचीहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट A12744 (Airbus A320) चे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) उतरताना धावपट्टीवरून घसरल्याचं समोर आलं आहे. या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप असून कोणालाही दुखापत झाली नाही, अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. दरम्यान, धावपट्टीवरुन घसरल्याने विमानाचे तीन चार फुटले आहेत. तसेच इंजिन क्षतीग्रस्त झाले असल्याचे माहिती मिळाली आहे.
ही घटना सकाळी ९:२७ वाजता घडली. विमान उतरत असताना मुंबईतील जोरदार पावसामुळे धावपट्टी ओलसर व निसरडी झाल्याने हे "रनवे एक्सकर्शन" घडलं. वैमानिकाने प्रसंगावधान राखून योग्य ती प्रक्रिया केली व विमान पुन्हा नियंत्रणात आणत यशस्वीरीत्या टॅक्सी करून गेटपर्यंत नेलं. सर्व प्रवाशांना सुरक्षित उतरण्यात आलं.
मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य धावपट्टी (09/27) वर या घटनेमुळे किरकोळ नुकसान झालं आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे संचालन सुरळीत ठेवण्यासाठी दुसरी धावपट्टी (14/32) सुरू करण्यात आली आहे.
एअर इंडियाने सांगितलं की, "फ्लाइट AI2744 वर मुसळधार पावसाचा परिणाम झाला असून, उतरल्यानंतर धावपट्टीवरून घसरल्याचं निदर्शनास आलं. मात्र विमान सुरक्षित गेटपर्यंत नेण्यात आलं आणि सर्व प्रवासी सुखरूप उतरले. सध्या विमान तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आलं आहे."
मुंबईत पावसाचा जोर, वाहतूक व विमानसेवा प्रभावित
दरम्यान, मुंबईत रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सोमवार सकाळपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागांत पुढील प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे:
द्वीपभाग (Island city): 23.45 मिमी
पूर्व उपनगरे (Eastern suburbs): 36.42 मिमी
पश्चिम उपनगरे (Western suburbs): 50.02 मिमी
इंडिगो, स्पाईसजेट व आकासा एअरने प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत, कारण काही फ्लाइट्स उशीरा किंवा जरा विलंबाने उड्डाण करत आहेत.
हवामान खात्याचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांसाठी मुंबई व उपनगरांमध्ये वादळ, विजा व जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. महानगरपालिकेने उच्च भरतीचा इशारा दिला आहे. सकाळी ९:१९ वाजता 3.91 मीटर आणि रात्री ८:३७ वाजता 3.38 मीटर भरतीची नोंद होण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, प्रवासासाठी पर्यायी मार्ग वापरावेत आणि अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) देशातील व्यस्त विमानतळांपैकी एक असून, गेल्या काही वर्षांत काही गंभीर व महत्वाच्या घटना घडल्या आहेत.
1. सेप्टेंबर २०२३ - Learjet 45 (VT‑DBL) विमान रनवे एक्सकर्शन
घटना: विशाखापट्टणम (Visakhapatnam) ते मुंबईचे चाटर्ड विमान रनवे 27 वर उतरत असताना मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून बाहेर गेले आणि गवताळ भागात थांबले. विमान तुटले पण लगेच आग विझवण्यात आली. ८ प्रवासी व चालक दलातील सदस्य जखमी, विमानतळ ९० मिनिटांसाठी बंद राहिले व अनेक फ्लाइट्स दुसर्या मार्गावर वळवण्यात आल्या.
2. मे २०२१ - Air ambulance विमानाचे बेलिलँडिंग
घटना: नागपूर विमानतळावरून उड्डाणानंतर एका वैद्यकीय विमानाच्या मागील चाकात तांत्रिक बिघाड झाल्याने ते मुंबईत बेलिलँडिंग करावे लागले. सर्व प्रवासी सुरक्षित, कोणालाही इजा झाली नाही.
3. जून २०२४ - दुर्मिळ रनवे इनकरिजन
IndiGo फ्लाइट 5053 उतरत असताना Air India फ्लाइट 657 अजूनही धावपट्टीवर होते. प्रसंगवधान राखल्याने संभाव्य धोका टळला. DGCA ने तत्काळ ATC अधिकार्याला हटविले आणि तपास सुरू केला. आणखी एका घटनेत Air Astana विमान चुकीच्या मार्गावरून धावपट्टीवर आले आणि IndiGo अधिक खाली उतरत असताना हे घडले.
4. मे २०२४ - Emirates Flight 508 ला फ्लेमिंगो धडकले
दुबईहून येणाऱ्या Boeing 777 विमानाला गटकोपर परिसरात उड्डाणादरम्यान फ्लेमिंगो पक्षी धडकले. विमान सुरक्षित उतरले, कोणालाही इजा झाली नाही; मात्र कमीत कमी ३९ फ्लेमिंगो ठार झाले. विमानाला मोठे नुकसान झाले. परंतु फ्लाइट ऑपरेशनवर तत्काळ परिणाम झाला नाही.
5. जून २०२५ - Ethiopian Airlines Boeing 787 Dreamliner मधील डिप्रेस्युरायझेशन
ऍडिस अबाबाहून येणाऱ्या विमानात आकाशात दबाव कमी झाला. परिणामी सात प्रवासी आजारी पडले. एकाला रुग्णालयात भरती करावे लागले. विमानात इतर कोणालाही काही त्रास झाला नाही. विमान CSMIA ला सुरक्षित उतरले आणि तपास सुरू आहे.
6. जुलै २०२५ - IndiGo फ्लाइट इंजन फेल झाल्याने मुंबईत आपातकालीन लँडिंग
दिल्ली ते गोवा जाणारी IndiGo फ्लाइट 6E‑6271 (Airbus A320NEO VT‑IZB) उड्डाणानंतर इंजनमध्ये बिघाड झाला. फ्लाइट मुंबईत फेरमार्ग घेऊन सुरक्षित उतरले; सर्व प्रवासी सुखरुप होते.
7. जुलै २०५२५ - Akasa Air विमानाला ट्रक घासला
अलीकडेच एअरपोर्टमध्ये पार्क केलेल्या Akasa Air च्या Boeing 737 विमानाच्या उजव्या विंग्लेटवर एक मालवाहतुकीचा ट्रक घासला गेला. ग्राऊंड हॅंडलिंग टीमच्या चुकीने घटना घडली.


