पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला अति मद्यपान करायला लावून मीरा रोड येथील आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
मुंबई - लंडनस्थित एका विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याला २३ वर्षीय एअर होस्टेसवर बलात्कार केल्याप्रकरणी रविवारी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. हा आरोपी हॉंगकॉंगला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला अति मद्यपान करायला लावून मीरा रोड येथील आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
ही घटना २९ जून रोजी घडली आहे. पीडित तरुणी आणि आरोपी दोघेही लंडनस्थित विमान कंपनीत कार्यरत आहेत. लंडनहून परतीच्या प्रवासादरम्यान दोघांची ओळख झाली. मुंबईला आल्यानंतर आरोपीने पीडितेला मीरा रोड येथील एका पार्टीसाठी नेले. तिथे जबरदस्तीने तिला मद्यपान करायला लावले. त्यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याने कॅब बुक करून तिला आपल्या घरी नेले. तेथे तिच्या नशेच्या स्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने बलात्कार केला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती इतकी मद्यधुंद होती की ती प्रतिकारही करू शकली नाही.
बलात्कारानंतर पीडितेला मानसिक धक्का बसला. शिवाय आरोपीने तिला धमकीही दिली. "पोलिसांकडे तक्रार केलीस, तर परिणाम वाईट होतील," अशी धमकी आरोपीने दिल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. या धक्क्यानंतरही ती कामावर जात राहिली आणि एका आंतरराष्ट्रीय फ्लाइटवर परदेशात गेली. मात्र परतल्यानंतर तिने ठाम निर्णय घेतला आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६४ (बलात्कार), ३५१(१) (गंभीर धमकी) आणि ३५२ (जानबुजून अपमान करून शांततेचा भंग करण्याचा हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
एफआयआर दाखल झाल्यानंतर आरोपीने भारत सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने हॉंगकॉंगस्थित विमान कंपनीत नोकरी मिळवली आणि व्हिसाही मिळवला. मात्र पोलिसांनी तत्काळ हालचाली करत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्हिजिलन्स विभाग आणि सहार पोलिसांशी संपर्क साधला. अखेर रविवारी पोलिसांनी आरोपीला विमानतळावरून अटक केली.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडेमाळी करत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरेज कोळी यांनी ही माहिती दिली.
ही घटना विमानवाहतूक क्षेत्रातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही सोशल मीडियावरून होत आहे.


