- Home
- Mumbai
- Mumbai Bomb Blast 2006 : 19 वर्षांनंतर सर्व 12 आरोपी निर्दोष मुक्त, वाचा या १९ वर्षात कसा राहिला या केसचा प्रवास
Mumbai Bomb Blast 2006 : 19 वर्षांनंतर सर्व 12 आरोपी निर्दोष मुक्त, वाचा या १९ वर्षात कसा राहिला या केसचा प्रवास
मुंबई - ११ जुलै २००६ रोजी सायंकाळी मुंबईत लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोटांनी शहर हादरवून टाकलं. ११ मिनिटांत सात स्फोट घडवण्यात आले, ज्यात १८९ जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो गंभीर जखमी झाले. वाचा या केसचा १९ वर्षांतील प्रवास.

१२ आरोपींना निर्दोष घोषित केले
११ जुलै २००६ रोजी सायंकाळी मुंबईत लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोटांनी शहर हादरवून टाकलं होतं. अवघ्या ११ मिनिटांत सात स्फोट घडवण्यात आले होते, ज्यात १८९ जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो जण गंभीर जखमी झाले. आज, १९ वर्षांनंतर बॉम्बे उच्च न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरवलेल्या सर्व १२ आरोपींना निर्दोष घोषित करत, खटल्यात पुरावे अपुरे व असमाधानकारक असल्याचं स्पष्ट केलं आहे.
११ जुलै २००६: मुंबईत संध्याकाळी स्फोटांचे सत्र
सायंकाळी ६.२० ते ६.३५ या वेळेत, पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये सात आरडीएक्स बॉम्बस्फोट घडवण्यात आले.
पहिला स्फोट चर्चगेट ते बोरीवली दरम्यान असलेल्या लोकलमध्ये खार आणि सांताक्रूज स्टेशनदरम्यान झाला.
दुसरा स्फोट बरोबर त्याच वेळेस वांद्रे आणि खार रोडदरम्यान घडला.
उर्वरित स्फोट जोगेश्वरी, माहीम जंक्शन, मीरा रोड-भाईंदर, माटुंगा-माहीम जंक्शन आणि बोरीवली येथे झाले.
गुन्ह्याचा तपास आणि अनेक ट्विस्ट
१४ जुलै २००६: लश्कर-ए-कहर या दहशतवादी संघटनेने एका टीव्ही चॅनलला ई-मेलद्वारे जबाबदारी स्वीकारली.
१७ जुलै २००६: मुंबई फॉरेन्सिक लॅबने सांगितलं की, आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता.
१८ जुलै: मृतांसाठी मुंबईत श्रद्धांजली सभा आयोजित केली गेली.
२१ जुलै: तिघांना अटक करण्यात आली.
नोव्हेंबर २००६: महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत १३ आरोपी आणि १५ फरार आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल.
विरोधाभास आणि दुसरी कथित कबुली
जून २००७: आरोपींनी MCOCAच्या घटनात्मक वैधतेवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.
२००८-०९: क्राईम ब्रँचने पाच ‘इंडियन मुजाहिदीन’ (IM) कार्यकर्त्यांना अटक केली. IMने बॉम्बस्फोट केल्याचा दावा केला, ज्यामुळे ATSच्या तपासाशी विरोधाभास निर्माण झाला.
२००९: IMचा नेता सादिक शेखने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत स्फोटांची जबाबदारी स्वीकारल्याचं कबूल केलं.
२०१०: स्फोट प्रकरणातील काही आरोपींचे वकील शाहिद आझमी यांची कार्यालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
२०१३: IMचा सहसंस्थापक यासिन भटकल याने अटक केल्यानंतर सांगितले की २००६ मधील स्फोट हे २००२ गुजरात दंगलीचा प्रतिशोध होते.
२०१५ न्यायालयाचा निकाल आणि मृत्युदंड
सप्टेंबर २०१५: MCOCA विशेष न्यायालयाने १३ पैकी १२ आरोपींना दोषी ठरवलं.
५ आरोपींना मृत्युदंड: कमाल अन्सारी, फैसल शेख, एस्तेशाम सिद्दीकी, नावेद खान आणि आसिफ बशीर खान.
७ आरोपींना जन्मठेप: मोहम्मद अली, मोहम्मद साजिद अन्सारी, माजिद शफी, डॉ. तनवीर अन्सारी, मुज्जमिल शेख, झमीर शेख आणि सुहैल शेख.
१ आरोपी निर्दोष ठरला.
खटल्यात पुरावे अत्यंत कमकुवत होते
बॉम्बे उच्च न्यायालयाने सोमवारी सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करताना सांगितले की, "खटल्यात पुरावे अत्यंत कमकुवत होते आणि हे मानणं कठीण आहे की या आरोपींनीच गुन्हा केला."
न्यायालयाने विशेष न्यायालयाचा निकाल रद्द करत दोष सिद्ध न झाल्यामुळे आरोपींना मुक्त केलं.
न्याय मिळाला की न्याय हरवला?
हा निर्णय अनेकांसाठी धक्का देणारा ठरला असून, काहीजण याला "न्यायाचं अपयश" मानत आहेत, तर काहीजण अशा अपुर्या पुराव्यांवर शिक्षा देणं ही अन्यायकारक गोष्ट होती, असं सांगत आहेत.
या प्रकरणात सुमारे दोन दशके उलटल्यानंतर न्यायालयीन यंत्रणांकडून आलेला हा निकाल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करतो, खरा गुन्हेगार कोण होता? आणि खरेच, १८९ निरपराधांचे जीव जाण्याची जबाबदारी कोण घेणार?

