Mumbai Water Cut Alert: मुंबई महानगरपालिका (BMC) एम-पूर्व आणि एम-पश्चिम विभागात तांत्रिक कामांमुळे १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी ३० तासांची पाणी कपात जाहीर करत आहे. या काळात अनेक भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
मुंबई : उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) एम-पूर्व आणि एम-पश्चिम विभागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची तांत्रिक कामे हाती घेतली आहेत. यामुळे १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील काही महत्त्वाच्या भागांत तब्बल ३० तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
पाणी कपातीची वेळ काय असेल?
सुरुवात: गुरुवार, १२ फेब्रुवारी २०२६ - मध्यरात्री २:०० वाजल्यापासून.
समाप्ती: शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ - सकाळी ८:०० वाजेपर्यंत. (एकूण ३० तास पाणीपुरवठा खंडित राहील.)
कोणत्या भागात नळ कोरडे राहणार?
१. एम पूर्व (M-East) विभाग
एच.पी.सी.एल. रिफायनरी व वसाहत, वरुण बेव्हरेजेस, बी.ए.आर.सी., गव्हाणपाडा, इंडियन ऑईल, बी.पी.सी.एल. वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, राणे चाळ, आर.सी.एफ. कॉलनी, भारत नगर, हशू अडवाणी नगर, आणिक गाव, सह्याद्रीनगर, म्हाडा वसाहती, विष्णू नगर, राहुल नगर आणि अशोक नगर.
२. एम पश्चिम (M-West) विभाग
माहुल गाव, मरवली चर्च, माहुल एसआरए, वाशी नाका, अंबा पाडा, जिजामाता नगर, चेंबूर कॅम्प, सिंधी सोसायटी, म्हैसूर कॉलनी, विजय नगर, कोकण नगर, म्हाडा इमारती आणि आर.सी. मार्ग परिसर.
का घेतला जातोय हा ब्लॉक?
तुर्भे निम्नस्तरीय जलाशय येथे १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर नवीन जलद्वार (Gate Valve) बसवण्याचे आणि टनेल शाफ्ट जोडण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम पालिकेतर्फे केले जाणार आहे. या सुधारणेमुळे भविष्यात या विभागातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत आणि दाबाने होण्यास मदत होईल.
नागरिकांना पालिकेचं आवाहन
पाण्याचा साठा करा: दुरुस्तीच्या कामापूर्वीच आवश्यक पाणी साठवून ठेवावे.
उकळून पाणी प्या: पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुढील ३ दिवस पाणी उकळून आणि गाळून पिणे आरोग्यासाठी हिताचे ठरेल.
काटकसर करा: ३० तासांच्या या काळात पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.


