मुंबईतील एका शाळेत ४० वर्षीय शिक्षिकेने १२ वीच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या या प्रकरणात शिक्षिकेच्या मित्रावरही गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई : मुंबईतील एका नामांकित शाळेतील ४० वर्षीय महिला शिक्षिकेला १२ वीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या वर्षी जानेवारीपासून हा प्रकार सुरू होता. या प्रकरणात शिक्षिकेच्या एका मित्रावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने या कृत्यात तिला मदत केल्याचे समोर आले आहे.

असा झाला घटनेचा उलगडा

या प्रकरणाचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा १६ वर्षीय मुलाच्या वर्तनात बदल दिसू लागले. मुलाच्या पालकांनी त्याला बोलण्यास प्रोत्साहित केले आणि त्यानंतर त्याने आपल्यावर ओढवलेला भयानक प्रसंग पालकांसमोर कथन केला. पोलीस सूत्रांनुसार, आरोपी महिला शाळेत इंग्रजी शिकवते. ती विवाहित असून तिला दोन मुले आहेत.

कसा ओढवला प्रसंग?

तपासात असे समोर आले आहे की, डिसेंबर २०२३ च्या सुमारास शाळेच्या वार्षिक दिनाच्या सरावादरम्यान शिक्षिकेने या मुलाला पाहिले आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने तिला टाळले. त्यानंतर, तिने एका मित्राची मदत घेतली. या मित्राने मुलाशी संपर्क साधला आणि त्याला समजावले की, तरुण मुलांचे मोठ्या वयाच्या महिलांसोबत संबंध असणे असामान्य नाही.

अखेरीस, मुलाला शिक्षिकेला भेटण्यास राजी करण्यात आले. शिक्षिकेने त्याला आपल्या कारमधून एका निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेमुळे मुलगा पूर्णपणे हादरला आणि त्याच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. मात्र, यानंतरही शिक्षिका थांबली नाही. ती त्याला दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये घेऊन जात असे. तिथे ती त्याला दारू पाजवून त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होती, असे एका पोलीस सूत्राने सांगितले.

पालकांनी पोलिसांशी केला संपर्क

मुलाने हा प्रकार पालकांना सांगितल्यावर, बोर्डाच्या परीक्षा जवळ असल्याने आणि तो शाळा सोडणार असल्याने पालकांनी तातडीने मोठी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि शाळा सोडल्यानंतरही मुलाला नैराश्याने ग्रासले. जेव्हा आरोपी शिक्षिका आपल्या नोकरांमार्फत पुन्हा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे पालकांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला, असे अन्य एका सूत्राने सांगितले. पोलिसांनी महिला शिक्षिकेविरुद्ध भारतीय न्याय संहिता, लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि बाल न्याय कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर (FIR) दाखल केला आणि तिला शनिवारी अटक केली. सध्या या शिक्षिकेने शाळेतील अन्य कोणत्याही विद्यार्थ्याला लक्ष्य केले आहे का, याचा तपास सुरू आहे.