बुलढाण्यामध्ये एका दहावी इयत्तेमधील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरंतर, शिक्षकांनी अपमान केल्यामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यासोबत एक नोटही लिहिली आहे. 

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वसाडी बुद्रुक गावात मन हेलावणारी आणि संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना घडली आहे. १५ वर्षीय दहावीच्या विद्यार्थ्याने केवळ शाळेतील शिक्षकाच्या अपमानास्पद वागणुकीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

विनायक महादेव राऊत, वय १५, जय बजरंग विद्यालय, वसाडी बुद्रुक येथील दहावीचा विद्यार्थी. शाळेत वर्गशिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न देता आलं म्हणून शिक्षक गोपाल मारुती सूर्यवंशी यांनी त्याला उठाबशा करण्यास सांगितले. विनायकने पाय दुखत आहेत असे सांगून नकार दिला असता, शिक्षकांनी त्याला कपडे काढण्यास सांगितले, असा अपमानकारक प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपमानामुळे मानसिक धक्का बसलेल्या विनायकने शेतातील घरात अँगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत स्पष्टपणे शिक्षकाचा उल्लेख आणि मानसिक छळाचा तपशील होता.

चिठ्ठीत विनायकने लिहिलं की,“सूर्यवंशी मास्तर माझ्या पालकांबद्दल अपशब्द वापरतात, मानसिक त्रास देतात. कपडे काढ असं बोलल्यावर मला खूप वाईट वाटलं.”शेवटी त्याने लिहिलं की,"मी वर्गातील सगळ्यांना अखेरचं पाहून घेतलं... पुन्हा भेटणार नाही..." ही घटना समजताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. जय बजरंग विद्यालयातील अनेक विद्यार्थी घाबरलेले आणि मानसिक तणावात असल्याचं सांगितलं जात आहे.

पिंपळगाव राजा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशी यांना ताब्यात घेतलं आहे. ग्रामस्थांनी सांगितलं की, या शिक्षकावर यापूर्वीही गैरवर्तनाचे आरोप झाले होते. पण त्यांना केवळ बदली करून पुन्हा वसाडीमध्येच नियुक्त करण्यात आलं.गावकऱ्यांचं म्हणणं आहे की,"वेळीच कठोर कारवाई झाली असती, तर हुशार मुलाचा जीव वाचला असता." सदर घटनेने समाजातील शिक्षणव्यवस्थेतील शिस्तीच्या नावाखाली होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचं भीषण रूप समोर आलं आहे. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.