Mumbai : दादर जलतरण तलाव प्रकरणात पाच वर्षांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणासाठी 30 वर्षीय तरुणाला विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
मुंबई : दादर येथील जलतरण तलावात सुमारे पाच वर्षांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाला अखेर न्याय मिळाला आहे. विशेष पोक्सो न्यायालयाने 30 वर्षीय तरुणाला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना 6 मार्च 2020 रोजी घडली होती.
नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्र टाइम्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेदरम्यान आरोपीने 12 आणि 13 वर्षीय मुलींना आक्षेपार्ह स्पर्श करत त्यांचे लैंगिक शोषण केले होते. याबाबत 13 वर्षीय मुलीने तत्काळ महिला प्रशिक्षक आणि जीवरक्षकाला माहिती दिली. त्यानंतर संबंधित तरुणाला बोलावून जाब विचारला असता मुलीने त्याला ओळखले. त्यानंतर मुलीचे पालक घटनास्थळी आल्यानंतर आणखी एका 12 वर्षीय मुलीनेही त्याच आरोपीकडे बोट दाखवत आक्षेपार्ह प्रकार केल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी 13 वर्षीय मुलीच्या वडिलांनी पोलिसांत एफआयआर दाखल केला होता.
आरोपीचा बचाव
न्यायालयात आरोपीने स्वतःच्या बचावार्थ दावा केला की, जलतरण तलावात त्यावेळी 30 जण उपस्थित होते आणि पीडित मुलींनी चुकून त्याच्याकडे बोट दाखवले. तसेच एफआयआर दाखल करण्यात विलंब झाला असून सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध नाही, असा युक्तिवाद आरोपीकडून करण्यात आला.
तपास अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण
तपास अधिकाऱ्याने न्यायालयात सांगितले की, पीडित मुली घाबरलेल्या आणि रडत असल्याने एफआयआर नोंदवण्यात एक दिवसाचा विलंब झाला. शिवाय त्या जलतरण तलावाच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने दृष्य पुरावे उपलब्ध नाहीत. तरीही सरकारी पक्षाने दोन्ही पीडित मुलींसह आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवून आरोपीविरोधात पुरावे सादर केले.
न्यायालयाचा निर्णय
सर्व पुरावे आणि साक्षी लक्षात घेत न्यायाधीश बी. आर. गारे यांनी आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने म्हटले की, पीडित मुलींनी घटनेनंतर तात्काळ आरोपीला ओळखले होते आणि नंतर न्यायालयातही त्याची ओळख पटवली. हा महत्त्वाचा पुरावा मान्य करण्यात आला. सीसीटीव्ही आणि एफआयआर विलंबाबाबत सरकारी पक्षाने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. शेवटी आरोपीने मुलींचा पाठलाग करत दुष्कृत्य केले असल्याचे स्पष्ट झाले.


