मुंबई महापालिका निवडणुकीनंतर सत्तेच्या गणितांना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला महायुतीतून दोन स्वीकृत नगरसेवक पदे मिळाली असून त्यापैकी पहिल्या जागेवर आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांची नियुक्ती केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेच्या वाटपाचा खेळ सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत २९ जागांवर विजय मिळवला. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवक पदे आली असून त्यातील पहिल्या पदासाठी राज सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडत आहेत.

उमेदवारी न मिळाल्यानंतरही निष्ठा कायम

महापालिका निवडणुकीदरम्यान मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ५ मधून राज सुर्वे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली आणि त्या ठिकाणी संजय घाडी यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामुळे सुर्वे समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. तरीही राज सुर्वे यांनी कोणतीही बंडखोरी न करता पक्षनिष्ठा जपली आणि कार्यकर्त्यांसह निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या या संयम आणि निष्ठेची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत राज सुर्वे?

राज सुर्वे हे मागाठाणे मतदारसंघाचे सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र आहेत. ते युवासेनेत सक्रिय असून उत्तर मुंबईतील एक प्रभावी युवा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. मागाठाणे आणि दहिसर परिसरात त्यांचा मजबूत जनसंपर्क आहे. स्थानिक पातळीवर आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धा आणि विविध सामाजिक उपक्रमांत ते नेहमीच पुढाकार घेत असतात. वडिलांचा विकासाचा वारसा पुढे नेताना त्यांनी तरुणांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

उत्तर मुंबईत ताकद वाढवण्याची रणनीती

राज सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून झालेली नियुक्ती ही केवळ राजकीय समतोल साधण्यासाठी नसून उत्तर मुंबईत शिवसेनेची ताकद टिकवून ठेवण्यासाठी आखलेली रणनीती असल्याचे मानले जात आहे. या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान दुसऱ्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचे नाव चर्चेत आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.