Mumbai : मुंबईत आज महाविकास आघाडी आणि मनसेकडून मतदारयादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीविरोधात ‘सत्याचा मोर्चा’ काढला जात आहे. फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणारा हा मोर्चा मुंबई महापालिकेवर समाप्त होईल.
Mumbai : मतदारयाद्यांमधील कथित घोळ, मतचोरी आणि निवडणूक प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे आज (1 नोव्हेंबर) मुंबईत एल्गार पुकारणार आहेत. ‘सत्याचा मोर्चा’ असे नाव देण्यात आलेल्या या भव्य आंदोलनात राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर जनतेसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येणार आहे. मतदारयादीतील त्रुटी, दुबार नावे, मतदार वगळणे आणि मतांची चोरी या मुद्द्यांवर विरोधकांनी अनेकवेळा निवडणूक आयोगाला पुरावे देऊनही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. लोकशाहीची विश्वासार्हता टिकावी, नागरिकांना सत्य समजावे आणि मतदारयादीतील गोंधळ दूर व्हावा यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून मोर्चाला सुरुवात होईल. मेट्रो सिनेमा मार्गे पुढे मुंबई महापालिका मुख्यालयावर हा मोर्चा दाखल होणार असून, तिथे प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत.
या मोर्चात शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, मनसे हा मोर्चा महाविकास आघाडीसोबत काढत असल्याने या आंदोलनाला अधिक राजकीय वजन प्राप्त झाले आहे. राज ठाकरे आज दादरहून सीएसएमटीपर्यंत लोकलने प्रवास करणार असून, नुकत्याच रंगशारदा सभागृहात त्यांनी मतदारयंत्रे आणि मतदारयादीतील घोळावर सादरीकरण करत मुंबईकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.
विरोधकांच्या प्रमुख मागण्या
- मतदारयादी अद्ययावत कराव्यात
- दुबार नावे त्वरित हटवावीत
- यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणुका लांबवाव्यात
- 7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणीची मुदत वाढवावी
तथापि, काँग्रेसमधील काही नेत्यांनी या मोर्चापासून अंतर राखले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे. मनसेसोबत चालण्यास काँग्रेसच्या काही गटांकडून विरोध असल्याचेही बोलले जात आहे. मनसेसोबत एकोप्याने मोर्चा काढल्यास बिहार निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, असा विचार काही काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि प्रमुख विरोधी नेत्यांची एकत्रित उपस्थितीमुळे हा मोर्चा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मोर्च्यानंतर उद्या सर्व पक्षांची संयुक्त भूमिका अधिकृतपणे जाहीर केली जाणार असून, मतदारयादी घोळावर पुढील लढा किती तीव्र होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


