Mumbai Hostage Crisis :  मुंबईच्या पवई परिसरातील ओलीस प्रकरणातील आरोपी रोहित आर्यबाबत नवे खुलासे झाले आहेत. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमातील ‘लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाचा तो संचालक असल्याचं समोर आलं आहे.

Mumbai Hostage Crisis : मुंबईच्या पवई ओलिस प्रकरणात आरोपी असलेल्या रोहित आर्यबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाचा भाग म्हणून सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर’ या प्रकल्पाचा तो संचालक असल्याचे सांगितले जात आहे. शालेय शिक्षण विभागाने हा प्रकल्प थांबवल्याने स्वतःचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा त्याचा आरोप आहे.

20 कोटींचा प्रकल्प, 45 लाख नुकसानाचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी सरकारने 20 कोटी 63 लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र निधी न मिळाल्याचा आरोप करत रोहितने 45 लाख रुपये स्वतःचे अडकून गेल्याचे म्हटले आहे. शासन आदेशानुसार 12 जानेवारी 2024 रोजी त्याची अधिकृत नियुक्ती करण्यात आली होती. सरकारकडून पैसे न मिळाल्याने त्याने आझाद मैदानावर उपोषणही केले होते.

रोहित आर्यच्या प्रमुख मागण्या 

  • प्रकल्प बंद केल्याने आर्थिक नुकसान
  • 45 लाख रुपये बुडवल्याचा आरोप
  • आझाद मैदानात उपोषण
  • तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची भेट
  • मानसिक तणाव व उपचार सुरू असल्याचा दावा

केसरकरांच्या बंगल्यासमोर आंदोलन

रोहित आर्यने काही दिवसांपूर्वी माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या बंगल्यासमोरही आंदोलन केले होते. नागपूरमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या रोहितने स्वखर्चातून 60 ते 70 लाख रुपये खर्च करून स्वच्छता मोहीम राबवल्याचे सांगतो. निधी न मिळाल्यामुळे तो सतत आंदोलने करत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहे रोहित आर्य?

रोहित आर्य मुंबईतील पवईत ऍक्टिंग क्लासेस, कास्टिंग आणि ऑडिशन संबंधी काम करतो. सोशल मीडियावर तो स्वतःला फिल्ममेकर आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून सादर करतो. ‘अप्सरा’ नावाचे त्याचे यूट्यूब चॅनेल आहे. सरकारकडून अन्याय झाल्याचा आरोप करत तो गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे म्हटले जात आहे.

प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक, कर्ज घेतल्याचा दावा

स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी कर्ज काढून काम केले असून सरकारकडून पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे कोटींचे नुकसान झाले असल्याचा रोहितचा आरोप आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे.

पवईतील घटना कशी घडली?

पवईतील RA स्टुडिओमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेब सिरीजसाठी ऑडिशन्स सुरू होते. एकूण 17 विद्यार्थ्यांचे कास्टिंग होत होते. दुपारच्या सुमारास मुलांनी खिडकीतून हात दाखवत मदतीचे संकेत दिल्याने पालकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच हा ओलीस प्रकरणाचा प्रकार असल्याचे समोर आले.