मुंबईत पावसाच्या जोरदार सरी मध्यरात्रीपासून कोसळण्यास सुरुवात झाली आहे. अशातच हवामान खात्याने यल्लो अलर्ट शहरासाठी जारी केला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उसांत घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबईतील ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. खरंतर, मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला असून पुढील तीन ते चार तास शहरातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पहाटेपासून पश्चिम उपनगरांमध्ये पावसाने दमदार पुनरागमन केले आहे.
पश्चिम उपनगराला पावसाने झोडपले
अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुज आणि वांद्रे या भागांमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कमी असल्यामुळे अद्याप सखल भागांत पाणी साचलेले नाही. मात्र, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या काही मिनिटे उशिराने धावत आहेत. रस्ते वाहतुकीवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, बीड, सोलापूर, जळगाव आणि गडचिरोली या भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
पावसाचा जोर वाढणार
राज्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बहुतांश जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १३ ते १५ ऑगस्टदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे. मराठवाड्यात १४ आणि १५ ऑगस्टला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


