दादरमधील कबुतराखान्याजवळ आज मराठी एकीकरण समितीने आंदोलकांची धरपकड करण्यात आल्याचा प्रकार आज घडला. याशिवाय कबुतरखान्याजवळील दुकानेही बंद ठेवण्यात आली. 

मुंबई : दादरच्या कबुतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीने कबुतरखाना बंदच्या समर्थनार्थ आज (13 ऑगस्ट) आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव कबुतरखाना परिसरातील दुकानं दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली, तर सकाळपासून येथील जैन मंदिराचा दरवाजाही बंद करण्यात आला.

आंदोलन आणि पोलिसांची कारवाई

मराठी एकीकरण समितीने दिलेल्या आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देत बुधवारी सकाळपासून आंदोलक परिसरात जमले. घोषणाबाजी करत त्यांनी मोठा गोंधळ घातला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. या आंदोलनाला संयुक्त मराठी चळवळीचे कार्यकर्तेही पाठिंबा देत सहभागी झाले.

आंदोलनकर्त्यांची भूमिका

आंदोलकांच्या मते, कबुतरांना अन्न देण्याचा मुद्दा हा धार्मिक नसून समाजहिताचा आहे. त्यांनी आवाहन केले की, हा विषय जातीयवाद निर्माण करण्यासाठी वापरू नये. मराठी माणसाला कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, कबुतरखान्यावर लावलेली ताडपत्री जैन समाजाकडून फाडण्यात आली असून, त्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.

आरोग्याचा आणि सामाजिक हिताचा प्रश्न

आंदोलकांनी स्पष्ट केले की, कबुतरखाना बंदीचा मुद्दा हा ना मराठी, ना जैव, ना धार्मिक असा आहे, तर तो सरळ आरोग्य आणि सामाजिक हिताशी निगडित आहे. "मुंबई आमच्या हक्काची आहे, कुणाच्या बापाची नाही" अशा घोषणा देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

न्यायालयीन सुनावणीची प्रतीक्षा

सध्या कबुतरखान्यावरील बंदी कायम असून, या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. न्यायालयाचा निर्णय या आंदोलनाच्या भवितव्यावर परिणाम करणार आहे.