Mumbai Rains : मुंबईत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, वाचा हवामान खात्याचे अपडेट्स
Mumbai Rains : मुंबईला पावसाने झोडपले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय पुढील तीन दिवस शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा!
मुंबईसह पश्चिम उपनगरात आज (18 ऑगस्ट) पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरात जोरदार पावसाचा फटका बसला आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर पश्चिम उपनगरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे.
कामावर जाणाऱ्यांची वाढली चिंता
आज आठवड्याचा पहिला दिवस असून, मुसळधार पावसामुळे सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मुंबईसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि पश्चिम द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात पावसाचा जोर अधिक वाढला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दृश्यता कमी झाली असून रस्ते वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम होत आहे.
लोकल सेवेवर परिणाम
सध्या मध्य रेल्वे 5-10 मिनिटं उशिराने, हार्बर रेल्वे 5 मिनिटं उशिराने धावत आहे. पश्चिम रेल्वे मात्र सुरळीत सुरू असल्याचं समोर आलं आहे. मात्र पावसाचा जोर वाढला, तर लोकल सेवेवर अधिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धरणांचा जलसाठा 90% पार
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसामुळे जलसाठा झपाट्याने वाढला आहे. सध्या धरणांत 90% पाणी साठलं असून, वर्षभराची तहान भागेल एवढा साठा उपलब्ध आहे. ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी धरणांतून मुंबईला रोज 3900 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सातही धरणांची क्षमता 14.47 लाख दशलक्ष लिटर असून सध्या 13 लाख दशलक्ष लिटर साठा जमा झाला आहे.
पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट तर पुणे, सातारा, कोल्हापूर घाट भागाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनाऱ्यावर पावसासोबत जोरदार वाऱ्याची लाट आली असून पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे.

