Mumbai Mega Block Alert: रविवारी मुंबई रेल्वे विभागात मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. सेंट्रल लाईनवर शनिवारी मध्यरात्री तर वेस्टर्न लाईनवर रविवारी सकाळी ब्लॉक असेल. यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे.
मुंबई : रविवार म्हणजे बहुतांश मुंबईकरांसाठी सुट्टीचा दिवस कुणासाठी खरेदीचा, तर कुणासाठी फिरण्याचा. मात्र यंदाचा रविवार प्रवासाच्या दृष्टीने थोडा धावपळीचा ठरणार आहे. कारण, रेल्वे प्रशासनाकडून मुंबई विभागात मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे, जो देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत असतात. त्यामुळे या ब्लॉकचा परिणाम थेट प्रवाशांवर होणार असून, लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे.
सेंट्रल लाईन: शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक
विद्याविहार ते ठाणे (पाचवी आणि सहावी लाईन)
ब्लॉक कालावधी: 16 ऑगस्ट (शनिवारी) रात्री 12:40 पासून ते 17 ऑगस्ट (रविवार) पहाटे 4:40 पर्यंत
परिणाम
अप आणि डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले जातील
काही गाड्या 14 ते 20 मिनिटे उशीराने धावू शकतात
कसारा मार्गावरील तानशेत स्टेशन
ब्लॉक कालावधी: 16 ऑगस्ट रात्री 12:30 ते 17 ऑगस्ट पहाटे 5:05
उद्देश: इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम
परिणाम: विशेष ब्लॉकमुळे काही सेवा उशिराने किंवा बदललेल्या मार्गावर चालवली जातील
टीप: सेंट्रल लाईनवर दिवसा कोणताही ब्लॉक नसेल, त्यामुळे सकाळी-दुपारी प्रवास करणाऱ्यांना फारसा त्रास होणार नाही.
वेस्टर्न लाईन: रविवारी दिवसा ब्लॉकचा फटका
बोरिवली ते गोरेगावदरम्यान मेगाब्लॉक
ब्लॉक कालावधी: रविवार, 17 ऑगस्ट – सकाळी 10 ते दुपारी 3
परिणाम:
जलद मार्गावरील लोकल्स धिम्या मार्गावर वळवण्यात येणार
काही लोकल रद्द
काही गाड्या 20 मिनिटांपर्यंत उशीराने धावणार
अंधेरी-बोरिवली मार्गावरील काही लोकल्स गोरेगावपर्यंत हार्बर मार्गे चालवण्यात येणार
मुंबईकरांनो, कृपया लक्ष द्या!
रविवारी घराबाहेर पडण्याचं नियोजन करत असाल, तर रेल्वे ब्लॉकचं वेळापत्रक लक्षात घेऊन प्रवास करा. गर्दी आणि उशिर टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करा किंवा वेळेआधी प्रवास सुरू करा. रेल्वे प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचं आणि प्रवासादरम्यान काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.


