- Home
- Mumbai
- Mumbai Rains : उद्या मंगळवारी मुसळधार पावसामुळे शाळा, कॉलेजला सुटी, सोमवारी विद्यार्थ्यांचे झाले चांगलेच हाल!
Mumbai Rains : उद्या मंगळवारी मुसळधार पावसामुळे शाळा, कॉलेजला सुटी, सोमवारी विद्यार्थ्यांचे झाले चांगलेच हाल!
मुंबई - आज सोमवारी मुसळधार पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. हवामान खात्याने इशारा देऊनही सोमवारी शाळा आणि कॉलेज सुरु होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागले.

मुंबईत मुसळधार पाऊस
आज (18 ऑगस्ट) पहाटेपासून मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे भागात पावसाचा जास्त फटका बसला आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. त्यातून चालत जाणे धोकादायक झाले आहे. अनेक सोसायट्यांच्या आवारात पाणी शिरले आहे.
हवामान खात्याचा इशारा
पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांना मोठ्या असुविधेला सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब आणि पश्चिमेकडील स्थितीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील तीन दिवस असाच पाऊस राहण्याचा अंदाज आहे. आज सारखाच उद्याही पाऊस आला तर मोठी दैना होण्याची शक्यता आहे.
लोकल गाड्यांवर परिणाम
मध्य रेल्वे 5-10 मिनिटं उशिराने, तर हार्बर रेल्वे 5 मिनिटं उशिराने चालत आहे. पश्चिम रेल्वे मात्र सुरळीत आहे. पण पाऊस आणखी वाढला तर लोकल गाड्यांवर परिणाम होऊ शकतो. परंतु, लोकलला प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यामुळे लोकलमध्ये जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शिवाय कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता टाळता येत आहे.
धरणांमध्ये पाणी वाढले
मुंबईला पाणी देणाऱ्या धरणांमध्ये पावसामुळे पाणी झपाट्याने वाढले आहे. सध्या धरणांत 90% पाणी साठलं आहे, जे वर्षभर पुरेल इतकं आहे. ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी धरणांतून रोज 3900 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सातही धरणांची एकूण क्षमता 14.47 लाख दशलक्ष लिटर आहे, त्यापैकी सध्या 13 लाख दशलक्ष लिटर पाणी साठले आहे.
मंगळवारी शाळा, महाविद्यालये बंद
हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी अलर्ट दिला आहे. सोमवारी शाळा, महाविद्यालये सुरु राहिल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमिवर उद्या शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.
