- Home
- Mumbai
- Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास आता 'कूल' होणार! मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलचा धडाका; पाहा किती फेऱ्या वाढल्या?
Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास आता 'कूल' होणार! मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलचा धडाका; पाहा किती फेऱ्या वाढल्या?
Mumbai Local : मुंबईतील नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी असून पश्चिम, मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढणारय. जानेवारी 2026 पासून 10-12 अतिरिक्त फेऱ्या सुरू होण्याची शक्यता असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय.

रेल्वेकडून नोकरदारांना दिलासा!
Mumbai Railway News : रोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी रेल्वेकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेनंतर आता मध्य रेल्वेवरही नव्याने एसी लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जानेवारी 2026 पासून 10 ते 12 अतिरिक्त एसी लोकल फेऱ्या सुरू होण्याची शक्यता आहे.
वाढत्या गर्दीवर एसी लोकल हा उपाय
मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या आणि प्रवासादरम्यान होणारे अपघात लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाचा कल आता एसी लोकल सेवेकडे अधिक झुकताना दिसत आहे. साध्या लोकलच्या तुलनेत एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे (Automatic Doors) असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही काही अंशी सुटतो.
नवीन एसी लोकल मुंबईत दाखल
अलीकडेच पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नवीन एसी लोकल दाखल झाली आहे. त्याच धर्तीवर मध्य रेल्वेलाही एक नवीन एसी लोकल मिळणार असून, त्यामुळे दोन्ही मार्गांवर प्रत्येकी 10 ते 12 एसी लोकल फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. ही नवीन एसी लोकल चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मधून मुंबईत दाखल झाल्या असून, लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.
सध्याच्या एसी लोकलवरील भार होणार कमी
नवीन गाड्या सेवेत आल्याने सध्या सुरू असलेल्या एसी लोकलवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या
पश्चिम रेल्वेकडे 9 एसी लोकल
मध्य रेल्वेकडे 8 ते 10 एसी लोकल
सेवेत असल्याची माहिती आहे. मात्र आता हळूहळू लोकलच्या ताफ्यात एसी लोकलचे प्रमाण वाढवण्यावर रेल्वेचा भर असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंब्रा अपघातानंतर सुरक्षेवर विशेष लक्ष
9 जून 2025 रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर, ज्यामध्ये दोन लोकल एकमेकांना घासल्याने काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि 14 जण जखमी झाले होते, रेल्वे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. या घटनेनंतरच एसी लोकलची संख्या वाढवण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. याशिवाय, साध्या लोकल गाड्यांनाही ऑटोमॅटिक डोअर बसवण्याबाबत रेल्वे मंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
एसी लोकल तिकिटांमध्ये कपात होणार?
प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, एसी लोकलच्या तिकिटदरांमध्ये कपात करण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे अधिकाधिक नोकरदार वर्ग एसी लोकलकडे वळण्याची शक्यता आहे.

