- Home
- Maharashtra
- अंगारकी चतुर्थीला अष्टविनायक दर्शन स्वस्तात! पुण्यातून खास एसटी बस सेवा, बुकिंग कसं कराल?
अंगारकी चतुर्थीला अष्टविनायक दर्शन स्वस्तात! पुण्यातून खास एसटी बस सेवा, बुकिंग कसं कराल?
Ashtavinayak Darshan Bus From Pune : नवीन वर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त MSRTC ने ५ जानेवारी २०२६ला पुण्यातून विशेष अष्टविनायक दर्शन बस सेवा सुरू केली. ही २ दिवसांची यात्रा शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड आगारातून सुटेल.

अंगारकी चतुर्थीला अष्टविनायक दर्शन स्वस्तात!
Pune News : नवीन वर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC – ST) अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बस सेवा सुरू केली असून, ही सेवा ५ जानेवारी २०२६ रोजी पुण्यातून उपलब्ध होणार आहे.
पुण्यातील दोन प्रमुख आगारांतून बस सुटणार
भाविकांच्या सोयीसाठी ही विशेष एसटी बस शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून सकाळी ७ वाजता मार्गस्थ होणार आहे. दोन दिवसांच्या या विशेष यात्रेत अष्टविनायकाची आठही मंदिरे दर्शनासाठी कव्हर करण्यात येणार आहेत.
दोन दिवसांचा नियोजित प्रवास
या अष्टविनायक दर्शन सहलीदरम्यान प्रवाशांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था ‘भक्ती निवास’मध्ये करण्यात येणार आहे. मात्र, यासाठीचा खर्च भाविकांना स्वतः करावा लागणार आहे. नियोजनबद्ध प्रवासामुळे कमी वेळेत आणि सुरक्षितरीत्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
घरबसल्या करा ऑनलाइन बुकिंग
गर्दी टाळण्यासाठी आणि भाविकांचा वेळ वाचवण्यासाठी एसटी महामंडळाने ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भाविकांना www.msrtc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा MSRTC मोबाइल अॅपवरून तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे. तसेच, अधिकृत खाजगी बुकिंग केंद्रांवरूनही तिकिटे मिळणार आहेत.
मोठ्या ग्रुपसाठी खास ‘स्वतंत्र बस’ची सुविधा
४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांचा गट (गृहनिर्माण संस्था, मंडळे, मित्रपरिवार) एकत्र दर्शनासाठी जाणार असल्यास, त्यांच्या सोयीनुसार स्वतंत्र एसटी बस देण्यात येणार आहे. याबाबत माहिती पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली आहे. यामुळे मोठ्या ग्रुपला एकत्र प्रवास करणे अधिक सोयीचे ठरणार आहे.
वेळेत बुकिंग करण्याचं आवाहन
अंगारकी चतुर्थीला अष्टविनायक दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने, भाविकांनी वेळेत बुकिंग निश्चित करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

