मुंबईत 1 सप्टेंबर 2026 पासून दुधाच्या घाऊक दरात लिटरमागे 9 रुपयांची वाढ होणार आहे.

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरात 1 सप्टेंबर 2026 पासून दुधाच्या घाऊक दरात लिटरमागे 9 रुपयांची वाढ होणार आहे. मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनने (MMPA) दूध उत्पादकांच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा हवाला देत ही दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे घाऊक दुधाचा दर 93 रुपयांवरून 102 रुपये प्रति लिटर होणार आहे. हा सुधारित दर 28 फेब्रुवारी 2027 पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती एमएमपीएचे अध्यक्ष चंद्र कुमार सिंह यांनी दिली.

पशुखाद्य आणि देखभालीचा खर्च वाढला

दूध उत्पादकांसाठी जनावरांची देखभाल आणि पशुखाद्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धान्य, तूर चुनी आणि चणा चुनी यांसारख्या पशुखाद्याच्या घटकांच्या किमतीत 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय तेलबिया पेंड आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दरवाढ करण्यात आल्याचे एमएमपीएकडून सांगण्यात आले.

घाऊक दर वाढला, किरकोळ दर किती होणार?

एमएमपीएने जाहीर केलेली दरवाढ ही घाऊक दुधाच्या दरासाठी आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या किरकोळ दुधाच्या किमती संबंधित डेअरी, दूध पुरवठादार आणि वितरण व्यवस्थेनुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे 1 सप्टेंबरनंतर मुंबईकरांना प्रत्यक्षात किती दराने दूध मिळणार, हे संबंधित विक्रेत्यांच्या दरांवर अवलंबून असेल.

मात्र, घाऊक दरवाढीचा परिणाम घरगुती बजेटवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः चहाच्या टपऱ्या, मिठाईची दुकाने, हॉटेल्स आणि दूधावर आधारित पदार्थ विकणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या खर्चात वाढ होऊ शकते. आरे मिल्क प्रोस्डुसर असोसिएशनचे (Aarey Milk Producers Association) अध्यक्ष फिरोज पटेल यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या काळातील विविध अडचणींच्या काळातही दुधाचे दर कायम राहिल्याने उत्पादकांना व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे.

दूध महागण्यामागे कोणती कारणे?

  • MMPAने दूध दरवाढीसाठी वाढत्या उत्पादन खर्चासह अनेक कारणे सांगितली आहेत.
  • जनावरांना दिल्या जाणाऱ्या पशुखाद्याच्या किमती वाढल्या आहेत.
  • हरियाणा आणि गुजरातमधून खरेदी केल्या जाणाऱ्या जनावरांच्या किमती वाढल्या आहेत.
  • FDAच्या कारवायांमुळे सिंथेटिक दुधाचे उत्पादन कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
  • गवताच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पूर्वी 10 रुपये किलो असलेले गवत आता 18 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे.
  • विजेच्या खर्चातही वाढ झाली आहे.