जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मुंबईत 'आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन'तर्फे 'एज्युकेटर्स एज' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात शिक्षण आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या प्रभावावर सखोल चर्चा केली.
मुंबई : 'जागतिक मानसिक आरोग्य दिना'चे औचित्य साधून 'आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन'च्या 'चिल्ड्रन अँड टीन्स डेस्क'तर्फे 'एज्युकेटर्स एज: द ह्युमन एज इन द एज ऑफ AI' या कार्यक्रमाच्या पहिल्या आवृत्तीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शालेय प्रमुख, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि बालविकास तज्ज्ञांनी एकत्र येत शिक्षण आणि मानसिक आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा केली.
हा उपक्रम शिक्षणातील 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI - कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वाढता प्रभाव आणि मुलांचे मानसिक आरोग्य, भावनिक सुदृढता व सर्वांगीण विकासावर होणारे त्याचे परिणाम यावर विचारमंथन करण्यासाठी एक प्रभावी मंच ठरला. शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांनी एकत्र येत, तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाच शाळांमध्ये सहानभूती, मानवी संबंध आणि भावनिक कणखरता कशी जपता येईल यावर भर दिला.
AI मुळे वर्गखोल्या आणि शिकण्याच्या पद्धतींमध्ये वेगाने बदल होत आहेत. अशा वेळी युवा पिढीला केवळ डिजिटल कौशल्यांनी सक्षम न करता त्यांच्यामध्ये आत्मभान, भावनिक बुद्धिमत्ता, समीक्षात्मक विचार (Critical Thinking), करुणा आणि सहनशीलता यांसारखे आवश्यक मानवी गुण विकसित करणे गरजेचे असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा समावेश असलेली पॅनेल चर्चा पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर डिजिटल तंत्रज्ञानाचा होणारा परिणाम, भावनिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांची भूमिका आणि संतुलित, मानव-केंद्रित शिकण्याचे वातावरण तयार करण्यासाठीच्या रणनीती यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी AI चा वापर जबाबदारीने करावा यावर चर्चा सत्रात भर देण्यात आला. तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांचा स्वतंत्र विचार हिरावून न घेता त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला अधिक समृद्ध केले पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. डिजिटल होत चाललेल्या जगात मुलांमध्ये विचारक्षमता, भावनिक बुद्धिमत्ता आणि निरोगी नातेसंबंध विकसित करण्यासाठी शाळा आणि पालकांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे, यावर सर्वांचे एकमत झाले.
"मुलांना जोपर्यंत हे समजते की AI हे त्यांच्या शिकण्याला पाठबळ देणारे एक साधन आहे आणि ते त्यांच्याऐवजी विचार करू शकत नाही, तोपर्यंत त्याचा प्रभावी वापर होऊ शकतो. परंतु नातेसंबंधांकडे संवेदनशीलतेने पाहणे गरजेचे आहे. ही शाळा आणि कुटुंब यांची संयुक्त जबाबदारी आहे," असं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचे, डीन आणि सीईओ, अभिमन्यू बासू यांनी सांगितले.
सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात मुले ज्या पद्धतीने शिकतात, संवाद साधतात आणि एकमेकांशी जोडली जातात, त्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये असे वातावरण तयार करणे गरजेचे आहे जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला आपले अस्तित्व आणि मूल्य जाणवेल.
"समस्येचे मूळ हे आहे की आज कुटुंबांमध्ये पूर्वीसारखा संवाद उरलेला नाही, त्याऐवजी उलटतपासणी केली जाते. अर्थपूर्ण संवादाच्या अभावामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि मुले संवादासाठी इतर पर्याय शोधू लागतात," असं रेवती श्रीनिवासन, डायरेक्टर एज्युकेशन आणि ग्रुप डीन, सिंघानिया ग्रुप ऑफ स्कूल्स यांनी सांगितलं.
तसेच, AI आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी मूल्ये, आत्म-नियंत्रण (Self-regulation) आणि भावनिक सुदृढता अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.
"आत्म-नियंत्रण आणि मूल्यांचा विकास हा असा पाया आहे जो मुलांना तंत्रज्ञानाच्या वापरात योग्य दिशा दाखवेल आणि निर्बंध लादण्याची गरज कमी करेल," असं डॉ. स्मिता देसाई, संस्थापक, दृष्टी, यांनी म्हटलं.
शिक्षकांच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करताना श्री श्री विद्या मंदिर, बोरिवलीचे संस्थापक संचालक जयेश पंचाल म्हणाले,
"जेव्हा शिक्षक शांत, संयमी आणि भावनिकदृष्ट्या संतुलित असतात, तेव्हा ते विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक वातावरण तयार करतात. पालक शिक्षकांवर प्रचंड विश्वास ठेवतात आणि एक आनंदी शिक्षक संपूर्ण शालेय वातावरणावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतो."
विद्यार्थ्यांचे AI वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी मान्य केले. केवळ परीक्षा आणि गुणांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मुलांमधील उत्सुकता, शिकण्याची स्वायत्तता आणि ज्ञानाबद्दलची आवड जपण्यावर शिक्षणतज्ज्ञांनी भर दिला. गुणांपेक्षा शिकण्याच्या प्रक्रियेबद्दलच उत्साह निर्माण करणे हे विद्यार्थ्यांना सक्रिय विचारवंत, समस्या सोडवणारे आणि तंत्रज्ञानाचे जबाबदार वापरकर्ते बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले गेले.
'एज्युकेटर्स एज' या उपक्रमाच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनने शिक्षक आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांमधील संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन दिले आहे, जेणेकरून शिक्षणाचे भविष्य नाविन्यपूर्ण असण्यासोबतच मानवी मूल्यांनी समृद्ध राहील.
शैक्षणिक आणि तांत्रिक गुणवत्तेसोबतच मानसिक आरोग्याला प्राधान्य देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षक, पालक आणि धोरणकर्त्यांनी एकत्रितपणे काम करावे, या आवाहनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
'आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन'बद्दल -
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी स्थापन केलेली 'आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन' ही संस्था योग, ध्यान आणि विशिष्ट श्वसन प्रक्रियेच्या (सुदर्शन क्रिया) माध्यमातून मानसिक आरोग्याला चालना देते. ही संस्था मुलांसाठी आणि तरुणांसाठी विविध कार्यक्रम राबवते, ज्यामध्ये 'इंट्युशन प्रोग्राम'चा (Intuition Programme) समावेश आहे. हे उपक्रम शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सर्वांगीण विकासाच्या प्रयत्नांना पूरक ठरतात.


