Mumbai Dahi Handi 2025: मुंबईतील दहीहंडी उत्सवात एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोप बांधण्यादरम्यान तोल जाऊन पडल्याने त्यांचा जीव गेला. या घटनेव्यतिरिक्त ३० गोविंदा जखमी झाले आहेत.
मुंबई : दहीहंडीचा सण मुंबईत उत्साहात साजरा होत असताना मानखुर्दमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रनगरमधील एका मंडळाने दहीहंडी उभारणीदरम्यान रोप बांधण्याचे काम सुरू असताना ३२ वर्षीय गोविंदाचा उंचावरून कोसळून मृत्यू झाला. मृत गोविंदाचे नाव जगमोहन चौधरी असे आहे. रोपाची व्यवस्था करत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले.
उत्सवात जीव धोक्यात
शुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळेही गोविंदा पथकांचा उत्साह कमी झालेला नव्हता. पावसात भिजून उंच मनोरे रचण्याची धडपड सुरूच होती. मात्र या उत्साहात जीव धोक्यात घालणाऱ्या घटना घडत आहेत, आणि यंदाही अपवाद ठरला नाही. दहीहंडीच्या दिवशी ३० गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी १५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित १५ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दरवर्षीची पुनरावृत्ती?
मुंबई आणि उपनगरांमध्ये विविध गोविंदा पथकांमध्ये उंच थरांवरून दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असते. अशा वेळी सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येतो. दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात आणि काही वेळा जीवितहानीदेखील होते.
मुंबई महापालिका आणि रुग्णालये अशा आपत्कालीन प्रसंगांसाठी सज्ज असली, तरी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काटेकोर नियोजनाची गरज पुन्हा अधोरेखित होते. दहीहंडीचा सण हा आनंदाचा असला तरी त्यात सहभागी होणाऱ्यांची सुरक्षा याहून महत्त्वाची आहे. प्रत्येक पथकाने आवश्यक ती खबरदारी घेणे ही काळाची गरज बनली आहे.


