दहीहंडीचा उत्साह मुंबई-ठाण्यात जोरात पहायला मिळत आहे. अशातच जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने चक्क 10 थर लावत यंदा विश्वविक्रम केला आहे.
मुंबई : श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर राज्यभरात दहीहंडीचा थरार पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी गोविंदा पथके मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुसळधार पावसातही गोविंदांचा उत्साह कमी झालेला नाही. दादरच्या आयडियल येथे महिला गोविंदांनी दहीहंडी फोडून खास क्षण साजरा केला.
जोगेश्वरीत कोकण नगरचा विश्वविक्रम!
ठाण्यातील संस्कृती दहीहंडी कार्यक्रमात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला. यावेळी मैदानात एकच जल्लोष झाला.
मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “कोकण नगर पथकाने मराठी एकतेची खरी ताकद दाखवली. मी आधीच पारितोषिक जाहीर केले होते. या पथकाला २५ लाखांचे बक्षीस देत आहे.”त्यांनी पुढे सांगितले की, “विश्वविक्रम मोडण्यासाठीच असतो. याच मैदानावर आधीही विक्रम झाले आहेत आणि पुन्हा झाले.”
गोविंदांचा आत्मविश्वास
जोगेश्वरीतील विशाल कोचरेकर म्हणाले, “आम्हाला आत्मविश्वास होता की यंदा आम्ही १० थर लावणार. २०२२ मध्ये आम्ही ९ थरांचा विक्रम केला होता. यावेळी पथकात ५५० गोविंदा सहभागी झाले होते. दोन महिने सतत सराव करून दहा थरांचा सराव केला होता.”
प्रशिक्षकाचा सल्ला आणि भावूक क्षण
पथकाचे प्रशिक्षक विवेक कोचरेकर यांनी सांगितले की, “जखमी न होता दहा थर रचणे हेच आमचं ध्येय होतं.”विक्रम यशस्वी झाल्यावर पूर्वेश सरनाईक भावूक झाले, तर उपस्थित स्पॅनिश पाहुण्यांनीही या क्षणाचा आनंद व्यक्त केला.
आर्यन गोविंदा पथकाची दमदार एन्ट्री
कोकण नगर पथकानंतर आर्यन गोविंदा पथकानेही संस्कृतीच्या दहीहंडीत ९ थरांची सलामी दिली. तर यंदा या सोहळ्यात ऑपरेशन सिंदूर जनजागृती’ करण्यात येत असून, ‘शोले’ चित्रपटाला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष मानवंदना दिली जात आहे. यावेळी शोलेची प्रतिकृती पाहणाऱ्यांसाठी आकर्षण ठरली.


