मुंबईच्या माजगावात गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आयोजकांकडून आरोप करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईतील माजगाव परिसरात गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. रविवारी रात्री ही घटना घडली. गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आल्याचा आयोजकांचा आरोप आहे. त्यानंतर परिस्थिती चिघळल्याने पोलिसांनी तातडीने मोठा बंदोबस्त तैनात केला. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

माजगावात गणेशमूर्तीच्या मिरवणुकीत वाद

रविवारी रात्री गणेशमूर्ती आगमनाची मिरवणूक सुरू असताना दोन गटांमध्ये वाद झाला. मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आल्याचा आरोप गणेशोत्सव आयोजकांनी केला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. परिस्थिती आणखी चिघळू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी माजगाव परिसरात मोठ्या संख्येने कर्मचारी तैनात केले. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

भुलेश्वरमध्ये गणेशमूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू

याच्या एक दिवस आधी मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली होती. शनिवारी रात्री ‘भुलेश्वरचा राजा’ची विशाल गणेशमूर्ती कोसळून दोन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. सदर घटना भुलेश्वरमधील कबुतरखाना परिसरातील जय अंबे चौकाजवळ ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महापालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मंडळाच्या अध्यक्षांसह एका नागरिकाचा मृत्यू

या दुर्घटनेत अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि स्थानिक रहिवासी यांचा मृत्यू झाला. कोसळलेली गणेशमूर्ती अंगावर पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मूर्ती नेमकी कशामुळे कोसळली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, या परिसरात जवळपास ६० वर्षांपासून गणेशमूर्तीच्या आगमनावेळी आरती करण्याची परंपरा आहे.

यंदाचा गणेशोत्सव साजरा करायचा की नाही?

या दुर्घटनेनंतर गणेश मंडळाचे पदाधिकारी बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत. यंदाचा गणेशोत्सव साजरा करायचा की नाही आणि नवीन गणेशमूर्ती आणायची का, याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मंत्री आशिष शेलारांकडून दुःख व्यक्त

भुलेश्वर दुर्घटनेबाबत महाराष्ट्राचे मंत्री आशिष शेलार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तपासाच्या अहवालातून दुर्घटनेचे सर्व माहिती समोर येईल, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाचा उत्साह आणि आनंद असतानाच दोन गणेशभक्तांचा जीव गेल्याची घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे शेलार यांनी म्हटले. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांनी जखमींच्या लवकर प्रकृतीसाठी प्रार्थना केली.