Maharashtra Weather Rain Update : सरासरीपेक्षा महाराष्ट्रात पाऊस कमीच झाला आहे. राज्यभरात पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मुंबईत पावसाने दडी मारली आहे. मुंबई उपनगरं आणि नवी मुंबईतील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पावसाने अचानक दडी मारल्यानंतर आता हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कुठे - कसा असेल पाऊस?

दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांतील बहुतांश ठिकाणी, उत्तर कोकण जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांतील काही ठिकाणी, तसंच मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

राजस्थानवर प्रति-चक्रवात (Anticyclone) तयार होत आहे. १० तारखेपर्यंत मान्सून पश्चिम राजस्थानमधून माघार घेईल, ज्यामुळे उत्तर मैदानी प्रदेश आणि महाराष्ट्रात कोरडे वारे वाहतील. २ ते ६ सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा अल्पसा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ४ ते ५ सप्टेंबरच्या सुमारास मध्य भारतातील काही भागांत, ज्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर मराठवाडा या क्षेत्रांचाही समावेश आहे, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

देशभरासह महाराष्ट्रातही पाऊस कमीच

दरम्यान, देशभरातील पावसाचे प्रमाण १३ टक्क्यांनी कमी राहिले आहे. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ या भागांत पावसाची तूट कायम आहे. मराठवाड्यात २७ टक्के आणि विदर्भात २४ टक्के इतकी पावसाची तूट आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आगामी काळात मध्य आणि दक्षिण भारतातील काही भागांत पावसाच्या प्रमाणात कोणतीही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही. पावसाबाबत IMD च्या ERF (Extended Range Forecast) माहितीनुसार, २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर या कालावधीत पूर्व-मध्य भारत, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.