नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे अडकलेल्या ८० हून अधिक महाराष्ट्रीयन नागरिकांना सुखरूप परत आणण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. राज्याचं आपत्ती व्यवस्थापन पथक त्यांच्या संपर्कात असून, मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांकही सुरू करण्यात आले आहेत.
मुंबई : गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक आणि नागरिकांशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि सगळ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 'राज्य सरकार तुम्हाला लवकरात लवकर आणि सुखरूप परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,' असं आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिलं.
अडकलेल्या नागरिकांशी एकनाथ शिंदेंचा थेट संवाद
याआधी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "नेपाळमध्ये घडलेली घटना खूपच दुःखद आणि दुर्दैवी आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळला पूर्ण सहकार्य करत आहेत. महाराष्ट्रातील काही लोक तिथे आहेत. आमचं आपत्ती व्यवस्थापन पथक त्या लोकांच्या संपर्कात आहे... महाराष्ट्रातील जे नागरिक तिथे अडकले आहेत, त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी आम्ही काम करू..."
राज्य सरकारकडून बचावकार्यासाठी समन्वय
राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्राने (SEOC) दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील ८० हून अधिक नागरिक नेपाळमध्ये अडकले आहेत. ही आकडेवारी प्राथमिक असून, नक्की किती जण अडकले आहेत याची माहिती गोळा करण्याचं आणि मदत पोहोचवण्याचं काम सुरू आहे.
SEOC ने सांगितलं की, या ८० पैकी ५७ जण 'रिचा टूर्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीमार्फत गेले होते. राज्य यंत्रणेने या ट्रॅव्हल कंपनीशी संपर्क साधला असून, त्यांच्यामार्फत अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी समन्वय साधला जात आहे.
अडकलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी SEOC महाराष्ट्रने एक वेब-आधारित लिंक तयार केली आहे. ही लिंक सर्व जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचेल. जिल्हाधिकाऱ्यांनाही बाधित नागरिकांची माहिती गोळा करून ती तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेल्पलाइन आणि मदतकार्य
SEOC ची टीम वेब-फॉर्मद्वारे सतत माहिती गोळा करत आहे. चौकशी आणि मदतीसाठी एक हेल्प डेस्कही सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेले हेल्पलाइन क्रमांक ९३२१५८७१४३, १०७० आणि ०२२-२२०२७९९० हे आहेत.
ताज्या माहितीनुसार, चार नागरिक सुखरूप असल्याची खात्री झाली आहे. SEOC कडून गोळा केलेली ही सर्व माहिती नवी दिल्लीतील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या इंटिग्रेटेड कंट्रोल रूमलाही (Integrated Control Room - Emergency Response) पाठवली जाईल.
राज्य सरकार ट्रॅव्हल एजन्सी आणि अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहून आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
नेपाळमधील पुराची भीषणता
दरम्यान, नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) गुरुवारी एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील भोटे कोशी नदीला आलेल्या पुरामुळे आतापर्यंत ३८९ मृतदेह सापडले आहेत, तर ९७७ जण अजूनही बेपत्ता आहेत. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्कालीन केंद्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

