महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक चालकांना अस्खलित मराठी शिकण्यासाठी सरकारने एक वर्षाची मुदत दिली आहे. हा निर्णय कोणाच्याही नोकरीवर गदा आणण्यासाठी नाही, तर राज्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई : राज्य सरकारने सर्व सार्वजनिक वाहतूक चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणि त्यात अस्खलित होण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे. या निर्णयानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोर देऊन सांगितलं की, हा निर्णय कोणाच्याही रोजगारावर परिणाम करण्यासाठी नाही. सरनाईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा महायुती सरकारचा निर्णय आहे. परिवहन मंत्री म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यावर बंधनकारक आहे... कोणाचीही रोजीरोटी हिसकावून घेण्याचा आमचा हेतू नाही."

या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना मंत्री पुढे म्हणाले, "आमचा मुद्दा फक्त एवढाच आहे की, प्रत्येकाला महाराष्ट्राची संस्कृती आणि इथल्या मातीबद्दल आपुलकी असली पाहिजे. जशी प्रत्येक राज्याची स्वतःची ओळख असते, तशीच आमची मराठी ओळख असावी असं आम्हाला वाटतं... या एका वर्षात तुम्हाला फक्त तोंडदेखले काही शब्द नाही, तर आमच्यासारखं अस्खलित मराठी बोलता आलं पाहिजे. ही मुदतवाढ फक्त मराठी भाषेच्या गरजेसाठी दिली आहे, कोणालाही कायदेशीर कारवाईतून सूट देण्यासाठी नाही."

चालकांमध्ये निर्णयाबद्दल संमिश्र भावना

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंचू यादव नावाच्या एका टॅक्सी चालकाने मुदतवाढीचं स्वागत केलं, पण वेळेच्या मर्यादेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, "हो, मला मराठी येतं... पण यासाठी वेळेची मर्यादा नसावी... जर आम्हाला मराठी शिकण्याची सक्ती करायचीच होती, तर लायसन्स देतानाच तशी तरतूद करायला हवी होती. तरीही आम्ही आमच्या सोयीनुसार मराठी शिकू शकतो. आम्हाला काही अडचण नाही... त्यांनी आम्हाला एक वर्षाची वेळ दिली हे चांगलं आहे. पण आम्ही त्यात बांधले जाऊ नये... व्यवसायासाठी आवश्यक तेवढं मराठी मला येतं... या विषयात थोडं राजकारणही आहे."

झारखंडमधून आलेल्या आणखी एका टॅक्सी चालकानेही असंच मत व्यक्त केलं. तो म्हणाला, "सरकारला हिंदी भाषेची काय अडचण आहे हे मला कळत नाही. माझ्या टॅक्सीत बसणाऱ्या प्रवाशांना मी हिंदी बोलल्याने कधीच अडचण झाली नाही... मी माझ्या भाषेचा आग्रह धरत नाही. हिंदी ही आपल्या देशाची भाषा आहे. जर कोणी माझ्याशी मराठीत बोललं, तर मी नक्कीच मराठीत उत्तर देईन; त्यात काही अडचण नाही... हा नियम फक्त टॅक्सी चालकांसाठी आहे की इतरांसाठीही, हे मला स्पष्ट नाही."