सार

IMD Weather Update : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कडक उन्हाच्या झळा बसत असल्याने उष्माघाताची प्रकरणे समोर आली आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारी हैराण करणारी आहे. मार्च महिन्यापासूनच उष्माघाताची प्रकरणे समोर येऊ लागलीत.

Weather Update :  महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या 45 दिवसांमध्ये 77 जणांना उष्माघाताचा (Heatstroke) त्रास झाला आहे. अशातच मुंबईतील (Mumbai) तापमानही वाढणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी (15 एप्रिल) तापमानात वाढ होण्याची शक्यता असून 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमाचा पार जाऊ शकतो.

मुंबईकरांना कडक उन्हाच्या झळा बसणार
मुंबईतील तापमान गेल्या काही दिवसांपासून 32 ते 33 डिग्री सेल्सिअसपर्यंतच राहिल्याचे दिसून आले आहे. पण सोमवारपासून उन्हाच्या झळा अधिक बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होणार आहे.

सोमवारपासून पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्याचा जोर वाढला जाणार आहे. यामुळे सकाळच्या वेळेस तापमान 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. कमीत कमी तापमान 25 ते 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

37 डिग्री सेल्सिअपर्यंत जाणार तापमान
हवामान खात्यानुसार, 15 एप्रिलला तापमानत 36 डिग्री सेल्सिअस आणि 16 एप्रिलला तापमान 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रविवारी (14 एप्रिल) मुंबईतील अधिकाधिक तापमान 33.2 डिग्री सेल्सिअस आणि कमीतकमी तापमान 23 डिग्री सेल्सिअसपर्यंत होते.

राज्यात उष्माघाताची प्रकरणे वाढली
आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 1 मार्च ते आतापर्यंत सर्वाधिक उष्माघातची प्रकरणे बुलढाण्यातून समोर आली आहे. यानंतर सिंधूदुर्ग, वर्धा, नाशिक, पुण्यासह कोल्हापुरमध्येही उष्माघाताची प्रकरणे समोर आली आहेत.

राज्यावर अवकाळी पावसाचे ढग
हवामान खात्यानुसार पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय बीड, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर येथेही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने यलो अ‍ॅलर्टही जारी केला आहे.

आणखी वाचा : 

मुंबईतील उष्माघाताचा मुलांना त्रास, जुलाब आणि उलट्यांच्या समस्यांमध्ये वाढ

दुकान आणि संस्थांवर मराठी बोर्ड नसल्यास Property Tax दुप्पट होणार, महापालिकेचा मोठा निर्णय