मुंबईत एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात हा मुलगा दुचाकीवर मागे बसून आपल्या आईला ट्रॅफिकमध्ये रस्ता दाखवताना दिसत आहे.
मुंबई : मुंबईतील एक व्हायरल व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा दुचाकीवर मागे बसलेला दिसतोय. त्याची आई गाडी चालवत असून, तो एका ट्रकच्या मागे तिला ट्रॅफिकमधून रस्ता दाखवताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा चिमुकला दुचाकीवर मागे बसून आजूबाजूच्या ट्रॅफिकवर बारीक लक्ष ठेवून आहे. कधी थांबायचं आणि कधी पुढे जायचं, हे तो हाताने खुणावून आपल्या आईला सांगत आहे. आजूबाजूच्या गाड्यांवर त्याची करडी नजर आहे. ट्रकच्या मागून एखादी गाडी ओव्हरटेक करून आईच्या गाडीला धडकणार तर नाही ना, याची तो काळजी घेताना दिसतोय. या लहानग्याचा हा निरागसपणा आणि आईबद्दलची काळजी पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत.
इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. आईची काळजी घेणाऱ्या या मुलाचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. माय-लेकाच्या या गोड नात्याला नेटकऱ्यांनी पसंतीची पावती दिली आहे. शहरातल्या गर्दीच्या रस्त्यांवर रोज घडणाऱ्या, पण सहसा दुर्लक्षित राहणाऱ्या काळजीच्या आणि जबाबदारीच्या क्षणांची ही घटना आठवण करून देते. या व्हिडीओमधील मुलगा आणि त्याची आई कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ मात्र वेगाने शेअर होत आहे.


