मुंबई लोकलमध्ये दरवाज्यावर बॅगा घेऊन उभे राहणे आता बंद होणार आहे. अलीकडेच लोकलमध्ये बॅगा एकमेकांना घासून झालेल्या अपघातानंतर हा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. नेमके प्रकरण काय आणि नियम याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Mumbai Local Safety : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लोकलच्या दरवाजात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांवर आता बंदी घालण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घासल्याने अनेक प्रवासी ट्रॅकवर पडले आणि त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत.

बॅग घासून घडलेली भीषण दुर्घटना

मध्य रेल्वेमार्गावरील दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. त्या वेळी दोन लोकल ट्रेन एकमेकांच्या समोरासमोरून जात होत्या आणि त्यामध्ये दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांना धडकल्या. यात आठ प्रवासी ट्रॅकवर पडले, त्यापैकी चारजणांचा मृत्यू झाला. हे प्रवासी फुटबोर्डवर उभे होते आणि त्यांच्याकडे लटकणाऱ्या बॅगमुळे हा अपघात झाला.

दरवाजात उभं राहणाऱ्यांसाठी बंदी आणि सुरक्षा उपाय

या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा दल आणि महामार्ग पोलीस यांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये मुख्य स्थानकांवर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय दरवाजात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यांना रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

1. नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर – नवीन लोकल ट्रेनमध्ये दरवाजे आपोआप बंद होणार आहेत, जेणेकरून दरवाजात उभं राहण्याची सवय थांबेल.

2. सध्याच्या गाड्यांमध्येही डोअर क्लोजरचा विचार – जुन्या ट्रेनमध्येही ऑटोमेटिक दरवाजे बसवण्याचा विचार सुरु आहे.

3. नवीन ट्रॅक प्रकल्प – कल्याण ते कसारा दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन, तर कुर्ला पर्यंत पाचवी व सहावी लाईनचा विस्तार होणार आहे.

4. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड – गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण.

5. ऑफिस टाईमचे वेगवेगळे नियोजन – सरकारी आणि खासगी कार्यालयांनी इन-आऊट टाइम वेगवेगळे ठेवण्याची विनंती, जेणेकरून प्रवाशांची गर्दी विभागली जाईल.

लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या घटना : 

  • डोंबिवली – कोपर (29 एप्रिल 2024)

26 वर्षीय रिया श्यामजी राजगोर लोकलमध्ये गर्दीमुळे दरवाजाजवळ उभी राहताना कोपर ते दिवा दरम्यान तोल गेली आणि ट्रॅकवर पडून जागीच मृत्यू झाला

  • गोरेगाव–मालाड (मार्च 2022)

22 वर्षीय रतन विश्वकर्मा गर्दीमुळे दरवाजात हाते लटकत राहिला, ट्रेन थोडी वेग घेताच हात सुटला आणि तो खाली पडला; ठार झाला

  • मुसळधार पावसात पोलीस कॉन्स्टेबल (27 सप्टेंबर 2024)

मुसळधार पावसात गर्दीमुळे कॉन्स्टेबल अमित गोंदके लोकलमध्ये दरवाजात उभा राहून घसरला. काही तास ट्रॅकवर पडून राहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला