- Home
- Mumbai
- Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!
Mumbai Local : मुंबईकरांसाठी भारतीय रेल्वे लवकरच स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन-एसी लोकल ट्रेन सुरू करणार आहे, ज्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. वाढत्या गर्दीमुळे होणारे अपघात रोखणे आणि प्रवाशांची सुरक्षा वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी!
मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी! मुंबई लोकलमधील प्रवास आता आणखी सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच स्वयंचलित दरवाजे असलेल्या नॉन-एसी लोकल ट्रेन सुरू करणार असून, यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे.
गेल्या काही वर्षांत वाढत्या गर्दीमुळे लोकलमध्ये अनेक अपघात झाले आहेत आणि अनेक प्रवाशांचा जीव गेला आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारने लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. नॉन-एसी लोकलमध्येही सुरक्षिततेचे नवीन मानदंड लागू करण्याचा हा मोठा उपक्रम मानला जात आहे.
नवीन लोकलची निर्मिती चेन्नईत सुरू
ही नवीन लोकल ट्रेन चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे तयार केली जात आहे. सध्या मुंबईच्या उपनगरीय मार्गावर सुमारे 3000 पेक्षा जास्त लोकल ट्रेन धावत असून, त्यात एसी आणि नॉन-एसी दोन्ही प्रकारच्या गाड्या आहेत. लवकरच या नेटवर्कमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या दोन नॉन-एसी लोकल सामील होणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.
मुंब्रा दुर्घटनेनंतर सुरक्षा उपायांना गती
मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा येथे काही वर्षांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरच स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकलच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आणि आता त्या प्रत्यक्षात उतरायला सज्ज आहेत.
रेल्वे मंत्र्यांची घोषणा
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, राष्ट्रीय वाहतूक सुरक्षेसाठी ऑटोमॅटिक डोअर-क्लोजर सिस्टम असलेल्या दोन नॉन-एसी लोकल ट्रेनसेट तयार केले जात आहेत. यामध्ये स्वयंचलित दरवाजे, डब्यांमधील वेस्टिब्यूल कनेक्शन आणि छतावरील आधुनिक व्हेंटिलेशन युनिट बसवले जाणार आहेत.
या लोकलमध्ये प्रवास करताना एसी लोकलसारखाच आराम मिळेल, फक्त एसी सुविधा नसेल. गर्दीतून पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
मुंबईत एसी लोकल संख्येत वाढ
सध्या मुंबई उपनगरीय मार्गावर 17 एसी लोकल गाड्या धावत आहेत. तसेच रेल्वे मंत्रालयाने 12 कोच असलेल्या 238 लोकल रॅक तैनात करण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 19,293 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, खरेदी प्रक्रिया सुरू आहे.

