Mumbai : मुंबई सेंट्रलजवळील उद्यानात वर्दीतील सहायक फौजदाराने गतीमंद महिलेसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी पोलिसाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

Mumbai : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील एका उद्यानात वर्दीतील पोलिसाने गतीमंद महिलेसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच संतप्त जमावाने संबंधित पोलिसाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या मैदानाला लागूनच पोलिस चौकी आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहायक फौजदाराला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

ताडदेव आरटीओकडे जाणाऱ्या साने गुरुजी मार्गावर महापालिकेचे भाऊसाहेब हिरे उद्यान आहे. लहान मुलांच्या खेळासाठी आणि नागरिकांच्या फेरफटक्यासाठी हे उद्यान कायम वर्दळीचे असते. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गणवेशातील एक पोलिस कर्मचारी एका तरुणीसोबत उद्यानात बसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला कोणीही संशय घेतला नाही, मात्र काही वेळाने प्रकार गंभीर व संतापजनक झाला.

नागरिकांचा संताप, पोलिसाला चोप

प्रत्यक्षदर्शींनुसार, संबंधित पोलिसाने त्या तरुणीशी लगट करत अश्लील चाळे सुरू केले. हा प्रकार पाहताच नागरिक संतप्त झाले. काही क्षणांतच जमाव जमा झाला आणि त्या पोलिसाला पकडून नागरिकांनी चोप दिला. उद्यानालगतच पोलिस चौकी असल्याने घटनेची माहिती मिळताच ताडदेव पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी पोलिसाला ताब्यात घेतले.

 पोलिस चौकशी आणि अटक

ताब्यात घेतलेल्या पोलिस कर्मचारी नशेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चौकशीत संबंधित तरुणी गतीमंद असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. आरोपी सहायक फौजदार हा पोलिस दलाच्या सशस्त्र विभागात कार्यरत असून सध्या ‘एल विभाग २’ येथे नेमणुकीस होता. या प्रकरणी ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

परिसरात खळबळ

या घटनेमुळे ताडदेव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वर्दीतील पोलिसाकडूनच अशा प्रकारचा गैरवर्तन झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या घटनेवर वरिष्ठ पातळीवरूनही लक्ष ठेवले जात असल्याची माहिती आहे.