मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 68 वर्षीय आजींना त्यांच्याच नातवाने जंगलातील कचऱ्यात फेकल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.सध्या आजींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मुंबई : आजी आणि नातवाचे नाते नेहमी आपुलकीचे, प्रेमाचे असते. प्रत्येक आजी आपल्या नातवडांवर जीवापाड प्रेम करते. पण मुंबईतील एका नातवाने याच नात्याला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे. खरंतर, एका 68 वर्षीय आजींना चक्क नातवानेच जंगलातील कचऱ्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 

यशोदा गायकवाड असे आजींचे नाव आहे. आजींनी त्यांची व्यथा सांगत म्हटले की, “माझ्या आजूबाजूला अंधार होता, विचित्र कुबट वास... कुठे आहे, काय चाललंय काहीच कळत नव्हतं... धड उभं राहता येत नव्हतं, आणि ज्याच्यात मी माझ्या गमावलेल्या लेकरांना पाहत होते, त्यानेच मला कचऱ्यासारखं जंगलात फेकून दिलं...”. हे कृत नातवाने आणखी दोघांसोबत मिळून केलयं. 

आरेच्या जंगलात फेकले

यशोदा गायकवाड यांना 21 जूनच्या रात्री, त्यांच्या 33 वर्षीय नातवाने अन्य दोघांसोबत मिळून त्यांना रिक्षातून घेऊन येत आरेच्या जंगलात आणून सोडले आणि ते निघून गेले. आजींमध्ये एवढी ताकद नव्हती की त्या नातवाच्या मागे धावू शकत नव्हत्या, मदतीसाठी हाका देखील मारल्या. पण काहीही झाले नाही. शेवटी देवाचे नाव मुखात घेत राहिले असे आजींनी महाराष्ट्र टाइम्ससोबत बोलताना सांगितले.

सुदैवाने वाचला जीव

रात्री जंगलात सोडून दिल्यानंतर सुदैवाने, पहाटे कोणीतरी मदतीला आलं. “कुठल्यातरी लाल गाडीतून लोक आले. त्यांनी मला उचललं आणि उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेलं”, असं यशोदा आजींनी सांगितले. सध्या कूपर रुग्णालयातच आजींवर उपचार सुरू असून हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पण रुग्णालयात सर्वजण काळजी घेतायत मात्र येथून गेल्यानंतर कुठे जायचे असा प्रश्न आजींना पडला आहे. 

मूळच्या बीडच्या 

मूळ बीड जिल्ह्याच्या यशोदा गायकवाड या अनेक दुःखातून गेल्या आहेत. पती गेल्यानंतर चर्मकार म्हणून काम करून उदरनिर्वाह केला. दोन मुलांपैकी एकाचा आणि नंतर मुलीचाही मृत्यू झाला. नातवाकडे त्या राहायला गेल्या, आणि त्याबदल्यात त्यांच्या दुकानाचे भाडेही त्याला देत होत्या. पण शेवटी त्याच नातवाने त्यांना जंगलात फेकून दिलं.

नातवाला माफ करण्याची विनवणी

पोलिसांनी नातवाने केलेल्या या अमानुष कृत्याबद्दल त्याच्यासह अन्य दोन जणांना अटक केली आहे. मात्र आजींना अजूनही नातवावर प्रेम आहे. आजी म्हणतात की, “त्याची चूक झाली, पण त्याला काही करू नका. त्याच्या मुलाचं काय?”, अशी काळजी त्या व्यक्त करतात. सध्या त्यांची नातसून शिल्पा आजींसोबत आहे आणि “झालं ते वाईट झालं, आमचं चुकलं”, असं म्हणत माफी मागत आहे. 

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.