मराठा आंदोलकांची प्रवासादरम्यान त्यांच्यात आणि प्रवाशांमध्ये झालेल्या वादाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, जुहूतील बसच्या काचाफोडी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीएसएमटीसह इतर भाग रिकामे करण्यात आले आहेत. 

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो मराठा बांधव गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले होते. आझाद मैदानात मर्यादित जागा असल्याने अनेक आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मंत्रालय, आमदार निवास, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि मरीन ड्राईव्ह परिसरात आश्रय घेतला होता. काही आंदोलक मुंबईलगतच्या भागांमध्ये आपल्या नातेवाईकांकडेही मुक्कामाला होते.

प्रवासादरम्यान वाद आणि व्हिडीओ व्हायरल

मुंबईत राहण्यासाठी अनेक आंदोलकांना बस आणि ट्रेनने प्रवास करावा लागत होता. या प्रवासादरम्यान आंदोलक आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याप्रकरणी आता कायदेशीर कारवाईची सुरुवात झाली आहे.

पहिला गुन्हा दाखल

जुहू परिसरात आंदोलक आणि बेस्ट बस प्रवाशांमध्ये रविवारी तुफान हाणामारी झाली होती. या झटापटीत आंदोलकांनी बसच्या काचा फोडल्या होत्या. याप्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासूनचा हा पहिलाच गुन्हा असल्याचं सांगितलं जात आहे.

लोकल ट्रेनमध्ये चकमक

याशिवाय सोशल मीडियावर समोर आलेल्या आणखी एका व्हिडीओत मुंबई लोकल ट्रेनमध्ये आंदोलक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे आंदोलक आणि सामान्य प्रवाशांमधील तणाव अधिक वाढल्याचे चित्र दिसत आहे.

न्यायालयाचे आदेश आणि पोलिसांची कारवाई

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत आझाद मैदानाशिवाय सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भाग मंगळवारी दुपारपर्यंत रिकामे करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत सीएसएमटी व हुतात्मा चौक परिसर पूर्णपणे खाली केला. या भागातील वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.

आझाद मैदानातील तयारी

सध्या आझाद मैदानात एक मोठा मंडप उभारला जात आहे. या मंडपात अडीच ते तीन हजार आंदोलकांना थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सीएसएमटी परिसरातील आंदोलकांच्या सर्व गाड्या हटवण्यात आल्या असून येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.