- Home
- Maharashtra
- Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा आंदोलकांना शेवटचा इशारा, 'मुंबईकरांना त्रास देऊ नका, अन्यथा परत जा!'
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा आंदोलकांना शेवटचा इशारा, 'मुंबईकरांना त्रास देऊ नका, अन्यथा परत जा!'
Manoj Jarange Patil : मुंबई उच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना मुंबईकरांना त्रास न देण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांना गावी परतण्याचा आदेश देत, आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला.

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर कठोर भूमिका घेतल्यानंतर, आता मनोज जरांगे पाटील यांनीही आपल्या आंदोलकांना महत्त्वाचा आणि अंतिम इशारा दिला आहे. "मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. कुणाच्या सांगण्यावरून रस्त्यावर हुल्लडबाजी करू नका," असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. जे आंदोलक नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांनी लगेच आपल्या गावाकडे परत जावे, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. जरांगे यांनी म्हटले की, “मी शेवटचे सांगतो आहे, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. जर तसे घडले तर त्याला सोडणार नाही.”
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मुंबईकरांची माफी
जरांगे यांनी आंदोलकांना सांगितले की, "मुंबईच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या तात्काळ आझाद मैदानाशेजारील क्रॉस मैदानात लावा आणि तिथेच झोपा." त्यांनी पुढे म्हटले, “मुंबईकर आपल्याला मदत करत आहेत, त्यामुळे त्यांना त्रास होईल असं कोणतही कृत्य करू नका. जर माझ्या आंदोलकांमुळे कुणालाही त्रास झाला असेल तर मी त्यांची माफी मागतो.”
हुल्लडबाजांना फटकारले
आंदोलनात काही चुकीची माणसे घुसल्याचा आरोप करत जरांगे यांनी त्यांना थेट दम दिला. “कुणीतरी एक व्यक्ती लोकांना भडकवून रोड अडवायला लावत आहे. त्याने अंतरवाली आणि मूक मोर्चाच्या वेळीही असेच केले होते. माझ्या जातीच्या प्रश्नावर असे चाळे करू नकोस. तुला नेत्यांचे पाय चाटायचे असतील, तर सावध राहा.”
आंदोलनाची प्रतिष्ठा राखा
जरांगे यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला, "मी आरक्षण मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही, जरी मला मरण आले तरी चालेल. जर तुम्हाला आरक्षण नको असेल किंवा गोंधळ घालायचा असेल तर तुम्ही आपापल्या गावी परत जा. मला माझ्या समाजाचा सन्मान राखायचा आहे, अपमान नाही."
एकंदरीत, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि जनरेट्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलनाची शिस्त राखण्यासाठी मोठी पाऊले उचलली आहेत. आता आंदोलक त्यांच्या आदेशाचे पालन करतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

