मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी नोटीस धाडली आहे. यानुसार, जरांगे पाटील यांना मैदान रिकामे करावे असे म्हटले आहे. 

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत. सुरुवातीला पोलिसांनी काही अटी-शर्तींसह आंदोलनास परवानगी दिली होती. मात्र नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत आता पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई हायकोर्टाचा आदेश आणि पोलिसांची कारवाई

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी निरीक्षण नोंदवत आंदोलकांनी दक्षिण मुंबईतील रस्ते व्यापल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने आंदोलकांना तातडीने सर्व रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिले. यानंतर मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून आझाद मैदान रिकामं करण्यास सांगितलं आहे.

सरकार-जरांगे चर्चेत गतिरोध

सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्राथमिक चर्चेनंतरही जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. त्यानंतरही सरकारकडून कोणताही ठोस प्रस्ताव आलेला नव्हता. मात्र काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच काही मंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर सरकारकडून लवकरच प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जरांगे पाटलांचा ठाम पवित्रा

आंदोलन सुरू करतानाच मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं की, “आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही.” त्यामुळे आता पोलिसांच्या नोटिशीला ते काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हायकोर्टाचे स्पष्ट निरीक्षण

मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, आंदोलन शांततेत आणि नियम पाळून होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शांतता बिघडू नये आणि सामान्य जनजीवन सुरळीत राहावे, यासाठी आंदोलकांनी व्यापलेले रस्ते व संबंधित जागा दुपारी 12 वाजेपर्यंत रिकामे करून स्वच्छ ठेवाव्यात. न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी आज दुपारी 1 वाजता वेळ दिला आहे.