Mahayuti Manifesto Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीचा मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. 

Mahayuti Manifesto Mumbai : मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीकडून मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला जाणार आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर शिवाजी पार्कवर संयुक्त सभा घेणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस मुंबईच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

महायुतीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध

महायुतीचा मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा आज सकाळी 11 वाजता वांद्र्यातील एमसीए क्लबमध्ये प्रसिद्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीरनामा सादर केला जाणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या या जाहीरनाम्याकडे विशेष लक्ष लागले आहे.

महिला, युवक आणि पायाभूत सुविधांवर भर

महायुतीच्या जाहीरनाम्यात महिला, युवक आणि मुंबईच्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या धर्तीवर ‘लाडक्या बहिणींना’ आत्मनिर्भर बनवण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.

रस्ते, युटिलिटी कॉरिडॉर आणि प्रदूषणमुक्त मुंबई

मुंबईत सुरू असलेले सर्व सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि युटिलिटी कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण करण्यावर महायुतीच्या जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे. तसेच मुंबईला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी तब्बल 17 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची तरतूद असून, स्वतंत्र पर्यावरण प्राधिकरण स्थापन करण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

पालिकेत पारदर्शकतेसाठी AI आणि डिजिटल प्लॅटफॉर्म

भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी एआय आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाणार असल्याचे आश्वासन महायुतीच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. यासोबतच तरुण उद्योजक आणि स्टार्टअपसाठी ‘इनोव्हेशन हब’ उभारण्याची घोषणाही करण्यात येणार आहे.

शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा

दरम्यान, नाशिकनंतर ठाकरे बंधूंची राजकीय तोफ आज मुंबईत धडकणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची आज शिवाजी पार्कवर भव्य संयुक्त सभा होणार आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर येणार आहेत.

मराठी मतदारांकडे साद, शक्तीप्रदर्शनाची तयारी

या सभेमधून ठाकरे बंधू मराठी मतदारांना आणि मुंबईकरांना नेमकी काय साद घालणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा “लाव रे तो व्हिडीओ” स्टाईलचा हल्लाबोल पाहायला मिळणार का, याचीही उत्सुकता आहे. या सभेमधून मोठे शक्तीप्रदर्शन होणार असल्याने शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू काय भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.