उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला. खतंरत, धनकड यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात याबद्दल चर्चा रंगली. अशातच आता महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) यांनी अचानक राजीनामा दिल्याची बातमी सोमवारी (21 जुलै) रात्री 10 वाजल्यानंतर झपाट्याने पसरली. काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याची चर्चा होती, आणि अखेर धनखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर करण्यात आला असून, राष्ट्रपती राजीनामा स्वीकारतात की नाही, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
राजीनामा दिल्यास राज्यसभेचे सभापती पद रिक्त होणार असून, उपराष्ट्रपतीपदासाठी नव्या नावांचा विचार होऊ लागला आहे. अशातच महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि सध्या राजस्थानचे राज्यपाल असलेले हरिभाऊ बागडे यांचं नाव या शर्यतीत आघाडीवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. याशिवाय तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही नावं चर्चेत आहेत.
74 वर्षीय जगदीप धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयाचे ऑपरेशन करण्यात आलं होतं. तरीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी राज्यसभेत भाषणं केली, तसेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठकही घेतली. त्यामुळे राजीनाम्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे.
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे कारण
धनखड यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केलं आहे की, “प्रकृतीची काळजी घेण्याचा वैद्यकीय सल्ला मला मिळाल्याने मी हा निर्णय घेतला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 67 (अ) अंतर्गत मी स्वेच्छेने उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देत आहे.” तसेच धनखड यांनी राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. “पंतप्रधानांचा पाठिंबा अमूल्य होता; त्यांच्या सहवासात बरेच शिकता आलं,” असंही त्यांनी नमूद केलं आहे. धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नवा उपराष्ट्रपती कोण होणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे हरिभाऊ बागडे यांचं नाव आघाडीवर असल्याने महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.


