पुणे-बंगळुरू महामार्गावर सोनं-चांदी व्यावसायिकाची कार अडवून २० लाख रुपयांची लूट करणाऱ्या १२ जणांच्या टोळीतील ७ जणांना सातारा पोलिसांनी केरळमध्ये अटक केली. त्यांच्याकडून ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित ५ आरोपी फरार आहेत.
Satara: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोनं-चांदी व्यावसायिकाची कार अडवून तब्बल २० लाख रुपयांची लूट करून केरळकडे पळ काढलेल्या १२ जणांच्या टोळीतील ७ जणांना सातारा पोलिसांनी केरळमध्ये जाऊन अटक केली असून, त्यांच्याकडून लुटीची रक्कम आणि वाहने मिळून एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील उर्वरित ५ आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या टोळीविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल असून ते दोन राज्यांमध्ये वाँटेड आहेत. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) या यशस्वी कारवाईमुळे सातारा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार अडवून सराफ व्यावसायिकाची केली लूट
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या लूटमारीच्या घटनेत सोनं-चांदी व्यावसायिक विशाल हासबे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. १२ जुलै रोजी रात्री भुईंज (ता. वाई) गावाच्या हद्दीत स्कॉर्पिओ, इनोव्हा आणि स्विफ्ट अशा तीन गाड्यांनी त्यांच्या कारला अडवले. लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आणि चाकूचा धाक दाखवत २० लाख रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली. लुटारूंनी केवळ पैशांची लूटच केली नाही, तर फिर्यादीचं अपहरण करून त्यांना सर्जापूर फाटा (ता. जावळी) परिसरात सोडून दिलं.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आलं. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि वाहने ओळखून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. योगेवाडी (ता. तासगाव) येथे विनीथ उर्फ राजन राधाकृष्ण याला अटक करण्यात आली. त्याने लुटलेली रक्कम एका ठिकाणी लपवून ठेवली होती, जी पोलिसांनी हस्तगत केली.
केरळमध्ये जाऊन संशयितांना घेतलं ताब्यात
पुढील तपासातून उर्वरित संशयित केरळमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सातारा पोलिसांचे पथक केरळला रवाना झाले. पलक्कड जिल्ह्यातील विविध गावांमधून नंदकुमार नारायणस्वामी, अजिथ कुमार, सुरेश केसावन, विष्णू क्रिशनकुट्टी, जिनु राघवन आणि कलाधरन श्रीधरन या सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं. या सर्वांकडून गुन्ह्यात वापरलेली वाहनेही जप्त करण्यात आली. यापूर्वी अटक केलेल्या विनीथसह या टोळीतील अटक केलेल्या संशयितांची संख्या सात झाली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
ही टोळी देशभरात लूटमारीसाठी कुख्यात असून तामिळनाडू आणि केरळ राज्यांतही वाँटेड आहे. त्यांनी सराफ व्यावसायिकांची वाहने आणि हवालामार्गे रोख रक्कम वाहून नेणाऱ्या गाड्यांना लक्ष्य केलं होतं. विशेष बाब म्हणजे, जानेवारी महिन्यात याच फिर्यादीची गाडी कर्नाटकात अडवून लुटण्यात आली होती, याची कबुलीही संशयितांनी दिली आहे. सातारा पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला असून त्यांचे राज्यभरात कौतुक होत आहे.
