मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत गणेशमंडळ जीएसबी सेवा मंडळाने यंदा गणेशोत्सवावेळी तब्बल ४७४.४६ कोटी रुपयांचा विमा काढला आहे. गेल्या वर्षी हा विमा ४०० कोची रुपये होता.

मुंबईतील सर्वात श्रीमंत गणेश मंडळ म्हणून ओळखले जाणारे किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळ यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल ४७४.४६ कोटी रुपयांचा विक्रमी विमा उतरवला आहे. मागील वर्षी मंडळाने ४०० कोटी रुपयांची पॉलिसी घेतली होती, तर २०२३ मध्ये ही रक्कम ३८ कोटींपासून वाढतच गेली आहे. यंदाच्या वर्षी विम्याच्या रकमेतील वाढीमागे प्रामुख्याने सोने-चांदीच्या दागिन्यांचे वाढलेले मूल्यांकन तसेच स्वयंसेवक आणि पुजाऱ्यांचा वाढलेला समावेश हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. मंडळाने प्रीमियमची अचूक रक्कम उघड न करता नॉन-डिस्क्लोजर कराराचा हवाला दिला आहे.

सोन्या-चांदीसाठी ६७ कोटींचा विशेष विमा

मंडळाच्या विमा पॉलिसीमध्ये सर्वात जास्त लक्षवेधी ठरणारी बाब म्हणजे सोने, चांदी आणि दागिन्यांचा समावेश असलेली सर्व जोखीम विमा पॉलिसी, जी तब्बल ६७ कोटी रुपयांची आहे. २०२४ मध्ये ही रक्कम ४३ कोटी होती, तर २०२३ मध्ये ३८ कोटी इतकी होती. सोने-चांदीच्या बाजारभावात झालेली लक्षणीय वाढ यासाठी जबाबदार आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर १,०२,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे, जो २०२४ मध्ये ७७,००० रुपये होता. जीएसबीच्या देवतेला यावर्षी ६६ किलो सोन्याचे दागिने आणि ३३६ किलो चांदीने सजवण्यात आले आहे, ज्यामुळे या विम्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.

स्वयंसेवक आणि पुजाऱ्यांसाठी ३७५ कोटींचा अपघात विमा

विमा रकमेतील सर्वात मोठा वाटा म्हणजे ३७५ कोटी रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा. यात स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, सेवक आणि सुरक्षा रक्षकांचा समावेश केला गेला आहे. दरवर्षी मंडळाच्या सेवेत शेकडो लोक कार्यरत असतात. त्यांचे संरक्षण आणि जोखीम व्यवस्थापन यासाठी या पॉलिसीची तरतूद करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी स्पष्ट केले की, “स्वयंसेवक आणि पुजारी यांचा समावेश ही या वाढीची एक मोठी कारणमीमांसा आहे.”

आगीपासून भूकंपापर्यंत विशेष संरक्षण

जीएसबी सेवा मंडळाच्या विमा कव्हरमध्ये फक्त दागिने किंवा अपघात विमाच नाही तर नैसर्गिक आपत्तींसाठीही संरक्षण आहे. भूकंपासह मानक अग्नि आणि विशेष संकट विमा २ कोटी रुपयांचा आहे. ही रक्कम मागील काही वर्षांपासून बदललेली नाही. त्याचप्रमाणे, ३० कोटी रुपयांच्या सार्वजनिक दायित्व विम्याद्वारे मंडप, स्टेडियम आणि भाविकांना कव्हर दिले गेले आहे. तसेच, ४३ लाख रुपयांचा मानक अग्नि आणि विशेष संकट विमा कार्यक्रमस्थळाच्या परिसरासाठी काढला आहे, ज्यामुळे एकूण व्यवस्थेला सुरक्षिततेची हमी मिळते.

गर्दी व्यवस्थापनासाठी नवीन योजना

यावर्षी जीएसबी मंडळ २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पाच दिवसांचा भव्य गणेशोत्सव आयोजित करणार आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी प्रवेश व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. पूजेसाठी देणगीदारांना वाढीव प्रवेश योजना देण्यात आली असून, गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष अमित पै यांनी सांगितले की, वाढलेले सोन्या-चांदीचे मूल्यांकन आणि सुरक्षा कारणास्तवच यंदाचा विमा विक्रमी स्तरावर नेण्यात आला आहे.