- Home
- Mumbai
- Dadar Station New Platform Number : प्रवाशांसाठी मोठी अपडेट! दादर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार? रेल्वेचा नवा प्लॅन चर्चेत
Dadar Station New Platform Number : प्रवाशांसाठी मोठी अपडेट! दादर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार? रेल्वेचा नवा प्लॅन चर्चेत
Dadar Station New Platform Number : दादर स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या हद्दीत १ नवा प्लॅटफॉर्म सुरू होणार असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक व्यवस्थेत बदल होणारय. रेल्वे प्रशासन नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक ८ देण्याऐवजी '7A' क्रमांक देण्याच्या विचार करतंय.

दादर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक बदलणार?
मुंबई : मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारे दादर रेल्वे स्थानक हे शहरातील सर्वात महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून येथे पश्चिम रेल्वेचा नवा प्लॅटफॉर्म क्रमांक 8 सुरू होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र आता या नव्या प्लॅटफॉर्ममुळे केवळ एक क्रमांक वाढणार नसून, संपूर्ण प्लॅटफॉर्म क्रमांक व्यवस्थेतच बदल होण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे.
दादर स्थानकावर दररोज लाखो प्रवासी ये-जा करत असल्याने कोणताही बदल करताना प्रवाशांचा गोंधळ टाळणे हे रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे विविध पर्यायांवर सध्या गांभीर्याने विचार सुरू आहे.
सध्याची प्लॅटफॉर्म क्रमांक रचना
सध्या दादर स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या हद्दीत प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 7, तर मध्य रेल्वेच्या हद्दीत 8 ते 14 असे सलग क्रमांक आहेत. पूर्वी दोन्ही रेल्वे विभागांत स्वतंत्रपणे 1 ते 7 असे क्रमांक असल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होत होता. हा गोंधळ टाळण्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक एकत्रित व सलग करण्यात आले.
नव्या प्लॅटफॉर्ममुळे काय बदल संभवतात?
पश्चिम रेल्वेच्या हद्दीत नवा प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील प्लॅटफॉर्मची संख्या आठ होणार आहे. त्यामुळे नव्या प्लॅटफॉर्मला थेट क्रमांक 8 द्यायचा की वेगळा पर्याय निवडायचा, यावर सध्या चर्चा सुरू आहे.
जर पश्चिम रेल्वेचा नवा प्लॅटफॉर्म क्रमांक 8 ठेवण्यात आला, तर मध्य रेल्वेचे सध्याचे प्लॅटफॉर्म क्रमांक पुढे सरकवावे लागतील. यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मध्य रेल्वेचे प्लॅटफॉर्म मुख्यतः लोकल सेवांसाठी वापरले जातात, तर पश्चिम रेल्वेचा नवा प्लॅटफॉर्म मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी असणार आहे. अशा परिस्थितीत एकाच क्रमांकामुळे प्रवासी चुकीच्या दिशेने जाण्याचा धोका वाढू शकतो.
‘7A’ हा पर्याय का चर्चेत?
या सगळ्या गोंधळावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाकडून नव्या पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्मला ‘7A’ असा क्रमांक देण्याचा पर्याय गांभीर्याने विचारात घेतला जात आहे. त्यामुळे सध्याची क्रमांक पद्धत कायम राहील आणि मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये कोणताही बदल करावा लागणार नाही, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांकडून मिळाली आहे.
प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य
दरम्यान, कोणताही अंतिम निर्णय घेताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्पष्ट दिशादर्शक फलक, डिजिटल डिस्प्ले बोर्ड आणि नियमित उद्घोषणांवर भर देण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम दादर स्थानकावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवर होणार आहे.

