दादरच्या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने वाद पुन्हा पेटला आहे. जैन समुदायाने पूर्वी ताडपत्री काढून टाकल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जैन मुनींनी सरकारला सामूहिक आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दादर: गेल्या काही दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना परत एकदा चर्चेत आला आहे. दादर येथील कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी आता वादाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेकडून बांबू आणि ताडपत्री लावण्याचं काम सुरू झालं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हायकोर्टाने कोणते निर्देश दिले होते? -
हायकोर्टाच्या आदेशानुसार या कबुतरखान्यावर आधी ताडपत्री आणि बांबू टाकण्यात आले होते. यावेळी जैन समुदायाच्या लोकांनी या ठिकाणी असलेली ताडपत्री काढून टाकली होती. त्यांनी ताडपत्री काढून टाकल्यानंतर आता परत एकदा ताडपत्री टाकण्यात येत आहे. यावेळी पोलिसांचा चारही बाजूनी बंदोबस्त असल्याचं दिसून आलं आहे.
कबुतरखान्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त
एका बाजूला जैन मुनींनी सरकारला सामूहिक आंदोलनाचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे दादरच्या कबुतरखान्याजवळ पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. कबुतरखाना येथे स्थानिक पोलिसांसोबत दंगल नियंत्रण पथकाला तैनात करण्यात आलं आहे. या ठिकाणी असणारी ताडपत्री जैन समुदायाने बुधवारी फाडून टाकली होती.
पुन्हा एकदा आंदोलन होण्याची शक्यता असून त्यामुळं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी असणारा कबुतरखाना बंद करण्यास जैन समुदायाने मनाई केली आहे. कबुतरखान्याला विरोध करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना देखील जैन मुनींनी काही प्रश्न विचारलेत. तसंच कबुतर खान्यासंदर्भात सरकारनं अपेक्षित भूमिका घेतली नाही तर कबुतरखान्यातच सामूहिक आंदोलन करण्यात येईल असा इशारा जैन मुनींनी दिला.
