BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी प्रशासन, निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली. 

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६च्या मतदानादरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण प्रशासन व यंत्रणा सत्ताधाऱ्यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागली असल्याचे सांगत, अशा प्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली. दादरमधील बालमोहन शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“येन-केन-प्रकारे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न”

राज ठाकरे म्हणाले की, सध्या निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने राबवली जात आहे, ती सर्वांसमोर आहे. सत्ताधाऱ्यांनी येन-केन-प्रकारे निवडणुका जिंकण्याचा निर्धार केला आहे. दुबार मतदारांचा मुद्दा समोर आणल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याचा आमच्याशी संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला असता, मतदाराला आपले मत योग्य उमेदवारालाच गेले की नाही, हे कळण्याची कोणतीही व्यवस्था नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Scroll to load tweet…

PADU मशीनवर संशय, आयोगाकडून स्पष्टता नाही

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने आणलेल्या PADU (Printing Auxiliary Display Unit) मशीनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवण्यात आलेले नाही आणि याबाबत आयोगाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही, अशी तक्रार त्यांनी केली. मतमोजणीवेळी वापरण्यात येणाऱ्या या यंत्रामुळे पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बोटावरील शाई, प्रचार सवलती आणि सत्तेचा गैरवापर

पूर्वी मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई आता मार्करने लावली जात असून, ती सॅनिटायझरने पुसली जात असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. तसेच प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी भेटी देण्याची मुभा देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत, ही सवलत सत्ताधारी पक्षाला पैसे वाटपासाठी देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी काम करत असल्याचे चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन

दादरच्या छबिलदास मतदान केंद्रावर सकाळी दुबार मतदार पकडला गेल्याचा उल्लेख करत, राज ठाकरे यांनी शिवसैनिक आणि मनसैनिकांना दिवसभर सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. सत्तेच्या गैरवापरालाही मर्यादा असाव्यात, असे सांगत, “शाई पुसून पुन्हा मतदानाला जाणे यालाच विकास म्हणायचे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.