BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान मतदारांच्या बोटावरील मार्करची खूण पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, मतदान करून बाहेर पडलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील खूण पुसली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विरोधी पक्षांकडून आधीपासूनच निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात असताना, या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा संशयाची छाया निर्माण झाली आहे.
शाईऐवजी मार्करचा वापर, पण खूण पुसतेय!
मुंबई महापालिका निवडणुकीत यंदा मतदारांच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी मार्करने खूण केली जात आहे. मात्र, हा मार्कर बोटावरून सहज पुसला जात असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. विशेष म्हणजे, बोटावरील नखावर लावलेली खूणच पुसत असल्याची कबुली मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. या प्रकारामुळे एकाच व्यक्तीने पुन्हा मतदान करण्याची शक्यता निर्माण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय शिवसेनेचे साईनाथ दुर्गे यांनी सोशल मीडियावर या संबंधित पोस्ट शेअर केली आहे.

कोल्हापूरमध्येही समान प्रकार
मुंबईपुरतेच नव्हे, तर कोल्हापूरमधील कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मतदान केंद्रावरही काही मतदारांच्या हातावरील खूण पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे हा मुद्दा केवळ एका शहरापुरता मर्यादित नसून, राज्यपातळीवरील गंभीर प्रश्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा शाईऐवजी मार्कर किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा मार्कर 2012 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरात असल्याचा दावा आयोगाकडून करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात ही खूण टिकत नसल्यामुळे आयोगाच्या निर्णयावर टीका होत आहे.
PADU मशीन आणि माध्यमांवरील निर्बंधांवर आक्षेप
या निवडणुकीत निवडणूक आयोगाने PADU (Printing Auxiliary Display Unit) नावाचे नवीन मशीनही काही वॉर्डमध्ये ईव्हीएमच्या बॅकअपसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या मशीनबाबत शेवटच्या क्षणी माहिती दिल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी, यापूर्वी कधीही न वापरलेले हे मशीन आताच का आणले, असा सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश नाकारण्याच्या निर्णयामुळेही आयोगावर टीकेची झोड उठली आहे.


