BMC Election 2025 च्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावरून तणाव आहे. यावर तोडगा काढण्यासाठी 16 डिसेंबरला मुंबईत समन्वय समितीची पहिली बैठक होणार असून, वॉर्डनिहाय अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

BMC Election 2025 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (BMC Election 2025) महायुतीतील जागावाटपावरून संघर्षाची शक्यता निर्माण झाली असतानाच, या मुद्द्यावर चर्चेसाठी अधिकृत मुहूर्त ठरला आहे. भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची पहिली बैठक मंगळवारी, 16 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या समन्वय समितीत भाजपकडून चार तर शिवसेनेकडून सहा नेते सहभागी होणार असून, जागावाटपावर प्राथमिक चर्चा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्ष आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप मुंबईत सुमारे 150 जागांवर तर शिवसेना 100 हून अधिक जागांवर दावा सांगत आहे. त्यामुळेच जागावाटपाची प्रक्रिया किचकट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारच्या बैठकीत सध्या असलेले विद्यमान नगरसेवक वगळता उर्वरित जागांवर प्राथमिक चर्चा केली जाणार आहे. प्रत्येक वॉर्डातील राजकीय समीकरणे, पक्षीय बलाबल, तसेच मागील निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी यांचा सखोल अभ्यास करून एक सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालाच्या आधारेच महायुतीतील वरिष्ठ नेते अंतिम जागावाटपाचा निर्णय घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून, आगामी निवडणूक ही 2024 नंतरची पहिली मोठी शहरी राजकीय लढत मानली जात आहे. त्यामुळेच BMC निवडणुकीतील यश-अपयशाचा थेट परिणाम राज्यातील सत्तासमीकरणांवर आणि महायुतीच्या भविष्यातील रणनीतीवर होण्याची दाट शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपाचा तोडगा कसा निघतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.