- Home
- Mumbai
- Mumbai Local : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! स्वयंचलित दरवाज्यांसह नव्या लोकल लवकरच धावणार, प्रवास होणार अधिक सुरक्षित
Mumbai Local : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! स्वयंचलित दरवाज्यांसह नव्या लोकल लवकरच धावणार, प्रवास होणार अधिक सुरक्षित
Mumbai Local : मुंबई लोकलच्या वाढत्या गर्दीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नॉन-एसी लोकल गाड्यांमध्येही आता स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार असून, चेन्नईमध्ये दोन नव्या रेकची निर्मिती सुरू झाली आहे.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी!
मुंबई : मुंबई लोकल ही शहराची जीवनरेषा मानली जाते. मात्र दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि त्यातून होणारे अपघात हा मुंबई उपनगरीय रेल्वेसमोर मोठा प्रश्न ठरत आहे. विशेषतः उघड्या दरवाजांमुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी आता भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, नॉन-एसी लोकल गाड्यांमध्येही स्वयंचलित दरवाजे बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वाढती गर्दी, वाढता धोका
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर दररोज सुमारे ३ हजार लोकल फेऱ्या धावतात. या लोकलमधून रोज तब्बल ६० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या दुर्घटनेनंतर लोकलमधील उघड्या दरवाजांमुळे प्रवाशांच्या जीविताला निर्माण होणारा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे.
एसी लोकलमध्ये आधीपासूनच स्वयंचलित दरवाज्यांची सुविधा असल्यामुळे प्रवासी बाहेर लटकण्याचे प्रकार कमी झाले असून अपघातांचे प्रमाणही घटले आहे. याच पार्श्वभूमीवर नॉन-एसी लोकलमध्येही हीच सुविधा देण्याची मागणी जोर धरू लागली होती.
नॉन-एसी लोकलसाठी नवे तंत्रज्ञान
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितले की, चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये स्वयंचलित दरवाज्यांसह दोन नॉन-एसी लोकल ईएमयू रेकची निर्मिती सुरू आहे. खासदार वर्षा गायकवाड आणि संजय दिना पाटील यांनी लोकलमधील अपघातांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
नव्या लोकलमध्ये काय असणार विशेष?
या नव्या लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षितता आणि आरामासाठी अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामध्ये
स्वयंचलित दरवाज्यांची सुविधा
डब्यांमधील वेस्टिब्युल जोडणी
छतावर विशेष व्हेंटिलेशन सिस्टीम
हवेच्या प्रवाहासाठी खिडक्यांवर झडप
यापूर्वी मध्य रेल्वेने कुर्ला कारशेडमध्ये अशाच प्रकारचा प्रयोग केला होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्याला तात्पुरती मान्यता मिळू शकली नव्हती.
जुन्या लोकलमध्ये बदल शक्य नाही
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सध्या धावणाऱ्या साध्या लोकल गाड्यांमध्ये थेट स्वयंचलित दरवाजे बसवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. मात्र भविष्यात सेवेत येणाऱ्या सर्व नव्या लोकल गाड्या या सुधारित आणि सुरक्षित स्वरूपातच आणल्या जातील.
यासोबतच, पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने २३८ नव्या एसी लोकल गाड्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील, अशी महत्त्वाची माहितीही रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात सुरक्षितता आणि सुविधा वाढवणारा हा निर्णय लोकल प्रवाशांसाठी नक्कीच दिलासादायक ठरणार आहे.
