MNS Bala Nandgaonkar : वरळी डोममध्ये झालेल्या मराठी विजय मेळाव्यात २० वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले. दोघांनीही एकत्र राहण्याचा संकेत दिला, ज्यामुळे मराठी जनतेत उत्साहाला उधाण आले.

मुंबई : तब्बल २० वर्षांनंतर एका ऐतिहासिक आणि भावनांनी ओथंबलेल्या क्षणाला मराठी जनतेने डोळ्यांनी साक्षी दिली. वरळी डोममध्ये भरलेल्या मराठी विजय मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे बंधू एकाच मंचावर एकत्र आले. मंचावर त्यांचं आलिंगन, प्रेमाने दिलेली कौतुकाची थाप आणि त्यांचे भाषण या सगळ्यांनी हजारोंच्या गर्दीत उत्स्फूर्त जल्लोष उसळला.

"एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी" : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी स्पष्ट शब्दांत सांगितलं, “एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी.” राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून दिली आणि “मराठी माणूस एकत्र ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत” असं ठामपणे सांगितलं. त्यांच्या या संयुक्त उपस्थितीने मराठी जनतेच्या हृदयात नव्या आशेचा किरण निर्माण केला.

बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे भावुक प्रार्थना

या ऐतिहासिक क्षणानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत भावनांनी ओथंबलेली पोस्ट लिहिली. ते म्हणाले, "याचसाठी केला होता अट्टाहास. दोन दशके वाट पाहिलेला क्षण आज पाहिला. बाळासाहेब जिथे असतील तिथून हा सोहळा पाहून आनंदले असतील. राजकीय आकांक्षांपलीकडे जाऊन ठाकरे बंधू एकत्र दिसावेत, हीच माझी इच्छा होती. आज ती पूर्ण झाली. आणि तीही आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी! पांडुरंगाकडे आता एकच मागणी 'जीवनात ही घडी अशीच राहू दे…'"

मेळाव्याचं राजकीय वर्तुळात मिश्र स्वागत

उद्धव आणि राज यांचं एकत्र येणं पाहण्यासाठी हजारोंनी गर्दी केली होती. मंचावर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं कौतुक करत त्यांच्या भाषणानंतर प्रेमाने हात मिळवला आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली. राजकीय पातळीवर या एकत्र येण्याच्या प्रत्यक्ष घोषणा झाली नसली तरी संकेत मात्र स्पष्ट आहेत. दरम्यान, या मेळाव्यात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह लहान मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र काँग्रेसचा एकही बडा नेता अनुपस्थित राहिला. त्यामुळे काँग्रेसचा पुढील भूमिका काय असेल, हे सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

राजकीय विभाजनाच्या दशकानंतर, मराठी माणसाच्या मनात एकतेचा नवा किरण फुललेला दिसतोय. बाळासाहेबांची स्वप्नं पुन्हा एकदा मूर्त स्वरूपात साकार होताना दिसत आहेत. बाळा नांदगावकर यांची ही प्रार्थना “ही घडी अशीच राहू दे” आता लाखो मराठी मनांची भावना बनली आहे.