रोशनी सोनघरे हिने अंधेरी येथील नामांकित विमान सेवातंत्र प्रशिक्षण संस्थेमधून एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेतले होते. ती दीड वर्षांपूर्वी एअर इंडियामध्ये ‘केबिन क्रू मेंबर’ या पदावर रुजू झाली होती.

कल्याण (मुंबई) - अहमदाबाद येथून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 विमानाचा गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात डोंबिवली पूर्वेकडील रहिवासी रोशनी राजेंद्र सोनघरे या केबिन क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी समजताच डोंबिवलीतील राजाजी पथावरील ओमिया इमारतीमध्ये आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

रोशनी सोनघरे हिने अंधेरी येथील नामांकित विमान सेवातंत्र प्रशिक्षण संस्थेमधून एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेतले होते. ती दीड वर्षांपूर्वी एअर इंडियामध्ये ‘केबिन क्रू मेंबर’ या पदावर रुजू झाली होती. तिच्या करिअरला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही काळातच तिच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबियांवर व परिसरातील लोकांवर शोककळा पसरली आहे.

गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे झेपावणारे AI-171 हे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच अहमदाबादच्या मेघानगर भागात कोसळले. या अपघातात विमानातील २३० प्रवासी व १२ क्रू मेंबर्सपैकी बहुतांश जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रोशनी सोनघरे यांचा देखील त्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

मुलीवर अगदी लहानपणापासून विमानसेवेत काम करण्याचे स्वप्न होते, ती खूप मेहनती होती आणि कुटुंबासाठी कष्ट घेत होती, असे तिच्या शेजाऱ्यांनी सांगितले. अत्यंत हसतमुख, नम्र आणि मेहनती स्वभावाच्या रोशनीने काही महिन्यांपूर्वीच आपले पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण पूर्ण केले होते. आज तिच्या आकस्मिक निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

एअर इंडियाच्या या अपघातानंतर टाटा समूहाने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीनुसार रोशनीच्या कुटुंबालाही १ कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. मात्र त्यांच्या मुलीच्या अचानक गेलेल्या आयुष्याची भरपाई कोणताही मोबदला देऊ शकत नाही, असं कुटुंबीयांनी अश्रूंच्या गहिवरात सांगितलं.

डोंबिवलीसारख्या छोट्या उपनगरातून आकाशात झेप घेण्याचं स्वप्न उराशी बाळगून यशस्वी झालेली रोशनी आज हजारो तरुणांसाठी प्रेरणा होती, आणि तिचा आकस्मिक मृत्यू एक अपूरं स्वप्न मागे सोडून गेला.