येत्या 16 ऑगस्टला दही हंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्याआधीच दही हंडीच्या सरावावेळी 11 वर्षांचा मुलगा थरावरुन खाली पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथे दहीहंडीच्या सरावादरम्यान सहाव्या थरावरून खाली पडल्याने एका बालगोविंदाचा मृत्यू झाला. रविवारी रात्री दहिसर पूर्वेतील केतकीडपाडा परिसरात ही घटना घडली. मृत बालगोविंदाचे नाव महेश रमेश जाधव (वय 11) असे असून, तो नवतरुण गोविंदा पथकाचा सदस्य होता.
सहाव्या थरावरून पडताच मृत्यू
दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर असल्याने महेश आपल्या पथकासोबत सराव करत होता. रात्री साधारण पावणेदहाच्या सुमारास तो सहाव्या थरापर्यंत चढला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट जमिनीवर कोसळला. गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अध्यक्षावर गुन्हा दाखल
घटनेनंतर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, महेशच्या आईच्या तक्रारीनंतर नवतरुण मित्रमंडळ गोविंदा पथकाचा अध्यक्ष बाळू सुरनार याच्यावर निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
महेश दहिसर पूर्वेतील धारखडी भागात राहत होता. त्याची आई घरकाम करते, तर वडील मजुरी करतात. त्याला तीन लहान भावंडे आहेत. पोलिस सध्या हा प्रकार अपघाती होता की यामागे काही घातपात आहे, याचा तपास करत आहेत.
दहीहंडीतील सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष
मुंबई उच्च न्यायालयाने लहान मुलांना वरच्या थरावर चढवू नये आणि दहीहंडी खेळताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गादी यांसारखी साधने वापरणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अनेक पथकांकडून या नियमांचे पालन केले जात नाही. यावर्षी 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी शहरातील शेकडो गोविंदा पथके सज्ज होत आहेत.


