Weather Update : राज्यातील हवामानात दररोज मोठे बदल होत असून हिवाळ्याचा शेवट जवळ आल्याचं स्पष्ट होत आहे. थंडीचा कडाका कमी होत असताना दिवसाचे तापमान वाढत आहे.

Weather Update : राज्यात सध्या हवामानाचा लपंडाव सुरू असून दररोज वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. हिवाळ्याचा शेवट जवळ येत असल्याचं स्पष्ट चित्र असून थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. सकाळी काही भागांत धुके जाणवत असलं, तरी दुपारनंतर उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत 27 जानेवारी 2026 रोजी राज्यातील हवामान कसं राहणार, याचा आढावा घेऊया.

मुंबई-कोकणात उकाडा वाढणार, धुक्याची शक्यता

मुंबईत आज कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज असून किमान तापमान 19 ते 22 अंश सेल्सिअस राहील. थंडीचा जोर कमी झाल्यामुळे रात्रीचा गारवा कमी जाणवेल, तर दिवसा उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण पट्ट्यात तापमानात फारसा बदल होणार नाही. समुद्रकिनारी मध्यम वेगाने वारे वाहतील. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सकाळी हलके धुके आणि दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कोरडं हवामान, तापमानात वाढ

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि आसपासच्या भागात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान 29 ते 31 अंश तर किमान तापमान 14 ते 17 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. हवामान तज्ज्ञांच्या मते, पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होणार असून थंडीचा प्रभाव आणखी कमी होईल.

मराठवाडा-विदर्भात ढगाळ वातावरण, हलक्या सरींचा अंदाज

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहणार असून काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतही आज ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ठाणे, नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाचा फटका

राज्यातील काही भागांत अचानक हवामान बदलामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात अनेक ठिकाणी आज सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. शहादा शहरासह अनेक भागांत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.