आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती देण्याची मागणी केली. एफआयआर दाखल न होणे, सीबीआय तपासातील दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर गांधींनी या प्रकरणात पूर्ण पाठिंबा दिला आहे. 

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे गूढ उकलण्यासाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राहुल गांधींनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पूर्ण ताकद लावण्याचे आश्वासन दिल्याने प्रकरणाला आता राष्ट्रीय वळण मिळण्याची शक्यता आहे.

'नेत्याचा FIR का घेतला जात नाही?' राहुल गांधींनी व्यक्त केलं आश्चर्य

भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "महाराष्ट्रासारख्या राज्यात एवढ्या मोठ्या नेत्याच्या (अजित पवार) अपघात प्रकरणात साधी एफआयआर (FIR) दाखल केली जात नाही, हे ऐकून राहुल गांधींनाही धक्का बसला. देशातील प्रत्येक नागरिकाला एफआयआर मिळणं हा त्याचा हक्क आहे."

रोहित पवारांनी मांडलेले प्रमुख मुद्दे

तपासातील अडथळे: DGCA अंतर्गत होणाऱ्या तपासात पारदर्शकता नसावी, अशी शंका पवारांनी व्यक्त केली. कलम १२ अंतर्गत वेगळी समिती स्थापन करून त्यात विरोधी पक्षनेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सीबीआय तपासाचा 'खो': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय तपासाचा शब्द दिला होता, मात्र २६ दिवस उलटूनही राज्य सरकारने अद्याप केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला नाही, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला.

सुशांत सिंह प्रकरणाचा दाखला: सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारने तत्परता दाखवली होती, मग अजित पवारांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार ढिम्म का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राहुल गांधींचा 'तो' शब्द आणि दोन दिवसांची वाट

राहुल गांधींनी या प्रकरणात काँग्रेस पक्षाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. "पुढच्या दोन दिवसांत काय पावले उचलली जातील, याचा शब्द त्यांनी मला दिला आहे. देशातील इंधन टंचाईच्या मुद्द्यासोबतच हा विषय टप्प्याटप्प्याने लावून धरला जाईल," असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले.

तेलगू देसम आणि व्ही. के. सिंग यांच्यावर निशाणा

या अपघातामागे काही आर्थिक आणि वैयक्तिक हितसंबंध असू शकतात, असा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी तेलगू देसम पार्टी, VSR आणि व्ही. के. सिंग यांच्यातील संबंधांची माहिती राहुल गांधींना दिली. या सर्व पैलूंचा विचार करता, आता हा तपास नव्या वळणावर जाण्याची चिन्हे आहेत.